खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या भेटीनंतर मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांनी दिले निर्देश
मुंबई दि.२४ ऑगस्ट :
साध्या लोकलच्या वेळेत एसी लोकल चालवण्याचा निर्णय अखेर मध्य रेल्वे प्रशासनाने मागे घेतला आहे. तसेच २५ ऑगस्ट म्हणजेच उद्यापासूनच पूर्वीप्रमाणेच साध्या लोकल चालवण्याचे आदेश मध्य रेल्वे महाव्यवस्थापक अनिल लाहोटी यांनी प्रशासनाला दिले आहेत. साध्या लोकलच्या वेळेत सुरू केलेल्या एसी लोकलमुळे सुरूवातीला कळवा आणि नंतर बदलापूर रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांनी आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर पूर्वीप्रमाणेच साध्या लोकल सुरू करण्याच्या मागणीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज मध्य रेल्वे महाव्यवस्थापक अनिल लाहोटी यांची भेट घेतली. त्यानंतर महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी उद्यापासून म्हणजेच २५ ऑगस्टपासूनच साध्या (नॉन एसी) लोकल पूर्ववत होतील असा निर्णय घेत याबाबत संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ऐन गर्दीच्या वेळेत साधी लोकलऐवजी एसी लोकल आल्याने सर्वसामान्य प्रवाशांना त्यानंतर येणाऱ्या साध्या लोकलमधून गर्दीमध्ये त्रासदायक प्रवास करावा लागत होता. त्यामुळे प्रवासी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचे हाल होत असल्याने प्रवाशांकडून संताप होत होता. गर्दीच्या वेळी सुरू असलेल्या कोणत्याही साध्या (नॉन एसी) लोकल बंद करू नयेत त्याचा प्रवाशांच्या गर्दीवर परिणाम होत असल्यामुळे ज्या साध्या लोकल बंद केल्या आहेत त्या पूर्ववत कराव्यात; अशी आग्रही मागणी आज या भेटीदरम्यान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांच्याकडे केली. त्यावर लाहोटी यांनी उद्या २५ ऑगस्टपासूनच साध्या (नॉन एसी) लोकल पूर्ववत होतील असा तातडीने निर्णय घेत संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना निर्देशही दिले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवरील प्रवाशांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या मोठ्या दिव्यातून हजारो प्रवशांची सुटका झाली आहे.
या प्रमुख प्रश्नासोबतच खासदार डॉ. शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील रेल्वे विषयक विविध समस्याही मांडल्या.
🔸 अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, दिवा, कळवा रेल्वे स्थानकातील विविध समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली.
🔸तसेच कळवा कारशेडमधून निघणारी आणि ठाण्याहून सुटणारी लोकल कळवा स्थानकात थांबवावी.
🔸 बदलापूर रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या होम प्लॅटफॉर्मचे काम तातडीने पूर्ण करावे.
🔸 कल्याण स्थानकात पूर्व भागात लोकग्रामच्या दिशेने तिकीट घराजवळ स्वयंचलित जिना आणि स्वच्छतागृह उभारणे.
🔸डोंबिवली स्थानकातील स्वच्छता ठेवण्याची मागणी देखील याप्रसंगी केली.
🔸यावेळी उपस्थित प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी दिवा स्थानकात फेस्टिव्हल स्पेशल मेल – एक्स्प्रेस गाड्याना थांबा मिळण्यासाठी फलाट क्रमांक सात आणि आठची रुंदी किमान २२ डब्यांपर्यंत वाढवावी अशी मागणी केली.
दरम्यान या सर्व मागण्यांचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करून त्यावर तातडीने निर्णय घेतले जातील, अशी माहिती यावेळी महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी दिली.
याप्रसंगी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख तथा ठाणे मनपा माजी महापौर नरेश म्हस्के, बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक अरुण आशान, विशाल पावशे, राजेंद्र साप्ते, सुभाष साळुंखे, अरुण सुरवळ, दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ऍड. आदेश भगत आदी उपस्थित होते.