Home ठळक बातम्या गूड न्यूज: प्रकल्प बाधितांना बीएसयूपीची घरे मोफत देण्याचा निर्णय – खा. डॉ....

गूड न्यूज: प्रकल्प बाधितांना बीएसयूपीची घरे मोफत देण्याचा निर्णय – खा. डॉ. श्रीकांत शिंदे

 

पहिल्या टप्प्यात साडे तीनशे लाभार्थ्यांना होणार फायदा

कल्याण – डोंबिवली दि.२७ सप्टेंबर :
कल्याण डोंबिवलीच्या विकासाचा आणखी एक मार्ग मोकळा झाला असून विकासकामांतील बाधित नागरिकांना बीएसयूपीची घरे मोफत दिली जाणार आहेत. यासाठी आकारली जाणारी प्रत्येकी १७ लाख रुपयांची रक्कम माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कल्याण डोंबिवलीमध्ये विविध रस्ता रुंदीकरण आणि इतर शासकीय प्रकल्प राबवण्यासाठी अनेक नागरिकांची घरे गेल्या दोन दशकांत तोडण्यात आली आहेत. मात्र दोन दशकांहून अधिक काळ उलटूनही यापैकी अनेक जण आजही शासकीय मोबदल्यासाठी प्रतीक्षेत आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या बीएसयूपी घरकूल योजनेअंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिकेने तब्बल सात हजार घरे उभारली असून त्यामध्ये चार हजार घरे शिल्लक राहिली आहेत. या प्रत्येक घरामागे केडीएमसीला १७ लाख रुपये सरकारकडे भरावे लागणार होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन म्हाडाला जे पैसे द्यावे लागणार होते ते १४ लाख रुपये शुल्क माफ करण्याचा निर्णय झाल्याची घोषणा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केली. या निर्णयामुळे एकूण ५६० कोटी रुपये राज्य सरकारने माफ केले आहेत.

तसेच आजच या बीएसयुपी घरांची पाहणी करून त्याठिकाणी आवश्यक असणारी सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही आपण दिल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे येत्या दोन अडीच महिन्यात बीएसयूपीची एक हजार रेडी पझेशनमध्ये उपलब्ध होणार असून पहिल्या टप्प्यात ३५० लाभार्थ्यांना ही घरे मोफत मिळणार असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर डोंबिवलीतील बीएसयूपी योजनेतील अपात्र असलेल्या लाभार्थ्यांना क्लस्टरचा लाभ होऊ शकतो. त्यापैकी अत्यंत निकड असलेल्या ९० लाभार्थ्यांना डोंबिवलीतील इंदिरानगर बी एस यू पी येथे तात्पुरत्या स्वरूपात सशर्त घरे देण्याचाही निर्णयही यावेळी जाहीर करण्यात आला.

रस्ते बाधिताना घरे मिळत नसल्याने रस्ते प्रकल्पांना अडसर निर्माण होत आहे. महत्वाचे म्हणजे कल्याण डोंबिवली हद्दीतील रस्ते विकास प्रकल्पात बाधित झालेल्या बाधितांना बीएसयूपी योजनेतून घरे देण्याचा हा निर्णय मदतीचा ठरणार आहे. कारण या निर्णयामुळे रस्ते विकास प्रकल्पांना गती मिळणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले. याशिवाय खोणी परिसरातील पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरे बांधली जात आहेत. ती लाभार्थ्यांना मिळवून देण्यासा विशेष प्रयत्न सुरु आहे. ही घरेही मिळवून दिली जातील असेही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

यावेळी खासदार शिंदे, केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासह आमदार विश्वनाथ भोईर, माजी महापौर वैजयंती घोलप, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, शहर प्रमूख राजेश मोरे, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे, मल्लेश शेट्टी, रवी पाटील, कैलास शिंदे, मयूर पाटील, महेश गायकवाड, श्रेयस समेळ आदी पदाधिकारी उपस्थिती होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा