बदलापूर दि.6 ऑगस्ट :
संपूर्ण ठाणे जिल्हा पिण्याच्या पाण्यासाठी ज्या धरणावर अवलंबून आहे अशा बारवी धरणात 96 टक्के पाणीसाठा झाला आहे. बारवी धरणाच्या कॅचमेट क्षेत्रात असाच दमदार पाऊस सुरू राहिल्यास येत्या दोन – तीन दिवसांत हे धरण 100 टक्के भरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.(Good News: Barvi Dam is 96 percent full)
गेल्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 21 जुलैपर्यंत बारवी धरणाचा पाणीसाठा अवघा 48 टक्के इतकाच झाला होता. मात्र त्यानंतरच्या पुढील दोन आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आणि अवघ्या 15 दिवसांमध्ये बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 48 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आज या धरणातील पणीसाठ्याने 96 टक्क्यांची पातळी गाठली आहे. ही ठाणे जिल्ह्यासाठी अतिशय आनंदाची बाब असून त्यामुळे ठाणे जिल्ह्याची पुढील वर्षभराची चिंता मिटली आहे. तर असाच पाऊस सुरू राहिल्यास येत्या दोन दिवसात हे धरण काठोकाठ भरण्याची शक्यता आहे.