स्वातंत्र्यदिनानिमित्त कल्याणात झाला ज्येष्ठांचा अनोखा कृतज्ञता सोहळा
कल्याण दि.17 ऑगस्ट :
ज्येष्ठ नागरिकांकडे अनुभवाची मोठी शिदोरी असून नव्या पिढीने तासनतास मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा रोज एक तास आपल्या आजी – आजोबांसोबत घालवण्याचे आवाहन आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे. देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
कल्याण पश्चिमेच्या वायले नगर येथील वायले सभागृहात झालेल्या या कृतज्ञता सोहळ्याला कल्याण शहर आणि परिसरातील शेकडो ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. भेटवस्तू आणि कृतज्ञता पत्र देऊन यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला.
आज कल्याण शहराचा जो चौफेर विस्तार आणि विकास होताना दिसतोय त्यामधे आपल्या समाजातील ज्येष्ठ नागरिकांचेही मोठे योगदान आहे. या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या उमेदीच्या काळात हे शहर घडवण्यासाठी आपलं आयुष्य खर्च केलं आहे. तर आपल्या आजवरच्या वाटचालीत हे ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या अनुभवाचा फार मोठा वाटा असल्याची प्रांजळ कबुली आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिली.
तर काळानुरूप समाजात बदल होत असतात. त्या काळाच्या ओघामध्ये आपले महत्त्व कमी झाले तरी ज्येष्ठ नागरिकांनी अजिबात निराश होऊ नये. आहे त्या परिस्थितीचा स्विकार करून ज्येष्ठ नागरिकांनी आपले पुढचे आयुष्य सुखी आणि समाधानी जगले पाहिजे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, अरविंद मोरे, महिला संघटक छायाताई वाघमारे, माजी नगरसेवक संजय पाटील, जयवंत भोईर, सुनिल वायले, उपशहर प्रमुख सुनिल खारुक, नेत्रा उगले यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.