कल्याण दि. 29 सप्टेंबर :
शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाचे कल्याणातील जिल्हाप्रमुख विजय साळवी यांना पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली असून याप्रकरणी साळवी यांना बाजू मांडण्याची पूर्ण संधी द्या अशी मागणी शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे. आमदार भोईर यांनी आज विविध पदाधिकारी आणि नगरसेवकांसह कल्याणचे डी सी पी सचिन गुंजाळ यांची भेट घेत यासंदर्भात निवेदन सादर केले. (Give full opportunity to Salvi to present his side in the matter of that notice – MLA Vishwanath Bhoir’s demand to the police)
शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय साळवी यांना काही दिवसांपूर्वीच कल्याणच्या एसीपींकडून तडीपार का करण्यात येऊ नये अशी विचारणा करणारी नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसीबाबत विजय साळवी यांनी आपल्याला संपर्क साधल्याची माहिती यावेळी आमदार भोईर यांनी डीसीपी सचिन गुंजाळ यांना दिली. विजय साळवी यांच्यावरील प्रमूख गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे असून त्यासाठी त्यांना तडीपार करणे न्यायोचित होणार नसल्याचेही आमदार भोईर यांनी डीसीपींना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर विजय साळवी यांना त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी द्यावी आणि सर्व कायदेशीर बाबी तपासून त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तर विजय साळवी यांच्यावर कारवाई करण्यामध्ये शासनाचा कोणताही हस्तक्षेप नाही की कोणताही आकस नाही. तसेच अशा कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अजिबात वेळ नसल्याचेही आमदार भोईर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेण्यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह माजी नगरसेवक रवी पाटील, जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर, सुनिल वायले, श्रेयस समेळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.