दिवाळी बोनससह विविध मुद्द्यांवर कामगार संघटना आणि केडीएमसी आयुक्तांमध्ये बैठक
कल्याण दि.14 ऑक्टोबर :
कोवीड काळात केडीएमसी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेलं काम पाहता त्यांना यंदाच्या दिवाळीत 25 हजार रुपये बोनस देण्याची मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेतर्फे करण्यात आली आहे. कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपाध्यक्ष रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. त्यावेळी बोनससह पदोन्नती, परिवहनच्या विविध महत्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
कल्याण डोंबिवली महापालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असणाऱ्या अनुकंपा, आकृतीबंध, सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगप्रमाणे फरकाची रक्कम देणे, प्रगती योजनेचा त्वरित लाभ देणे, सेवा ज्येष्ठता आणि पात्रतेनुसार प्रभारीपद देणे, पदोन्नती देणे, सुधारित आकृतीबंधातील स्वछता निरीक्षकास 100 टक्के सरळसेवा बदल, स्वछता निरीक्षक, अधिकारी पदाच्या मागण्या तातडीने मार्गी लावणे, सफाई कामगार, शिपाई, सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना प्रगती योजनेचा लाभ लवकरात लवकर देणे, खासगीकरण रद्द करून घनकचरा विभागात नव्याने कर्मचारी भरती करणे, कोवीडने मृत्यू झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना तातडीने सरकारी मदत मिळणे, परिवहनला महागाई भत्ता देणे, वेतन आयोगाची थकबाकी मिळणे, सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशी पूर्ण हिशेबाची रक्कम अदा करणे, नादुरुस्त बसेसच्या दुरुस्तीसाठी निधी देणे यांसारख्या विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
तर केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिल्याचे रवी पाटील यांनी सांगितले. तसेच आम्ही बोनसबाबत केलेल्या मागणीसंदर्भात केडीएमसी प्रशासनाकडून येत्या काही दिवसांत घोषणा केली जाणार असल्याचेही रवी पाटील म्हणाले.