(प्रातिनिधिक छायाचित्र)
कल्याण डोंबिवली दि.13 मे :
घाटकोपरमध्ये काल महाकाय होर्डींग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर अनधिकृत महाकाय होर्डिंग्जचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतही अनेक ठिकाणी अशी महाकाय होर्डिंग्ज उभारण्यात आली आहेत. प्रशासन त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट कधी करणार? की अशा प्रकारची दुर्घटना घडल्यानंतरच जागे होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (Ghatkopar tragedy: The issue of giant hoardings in Kalyan Dombivli is also on the focus)
वादळी वारे आणि पावसामुळे काल कल्याण,डोंबिवलीसह ठाणे मुंबईत अक्षरशः हाहाकार उडाला. एकीकडे मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने लाखो प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला. तर दुसरीकडे घाटकोपरमधील होर्डिंग्ज कोसळण्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा नाहक बळी गेला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतही ठिकठिकाणी मोठमोठाली होर्डिंग्ज उभारण्यात आली आहेत.
विशेषतः मुख्य रस्त्यांवर, मुख्य चौकांमध्ये किंवा त्याच्या जवळपास ही भलीमोठी होर्डिंग्ज उभारण्यात आली आहेत. काही वर्षांपूर्वी आलेल्या चक्रीवादळामध्ये होर्डिंग कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतही घाटकोपरसारखी दुर्घटना घडण्यापुर्वी केडीएमसी प्रशासनाने अशा सर्व महाकाय होर्डिंग्जचेही स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.