कल्याण दि.२७ ऑगस्ट :
केडीएमसी प्रशासनाने एकीकडे कालपासून प्रमुख रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू केले असेल तरी अंतर्गत रस्त्यांच्या दुर्दशेवरून नागरिकांमध्ये कमालीची नाराजी आहे. कल्याण पश्चिमेतील फोर्टिस रुग्णालय परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यांवरून स्थानिक रहिवासी चांगलेच संतप्त झाले आहेत. गणपतीपूर्वी हा रस्ता सुस्थितीत न आणल्यास रास्ता रोकोचा इशारा इथल्या स्थानिकांनी दिला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा रस्ते आणि त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या प्रश्नावरून सगळीकडून केडीएमसी प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे. कल्याण डोंबिवलीतील प्रमूख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांच्या खड्ड्यांमूळे झालेल्या दुरावस्थेने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे पावसाने उघडीप दिल्याने केडीएमसी प्रशासनाकडून कालपासून प्रमूख रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरुवात केली आहे. परंतू शहरातील अंतर्गत रस्त्यांची डागडुजी कधी केली जाणार असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
दरम्यान कल्याण पश्चिमेच्या एपीएमसी मार्केटजवळील फोर्टिस रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या ५-६ वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात इथल्या रस्त्याची दुर्दशा होत असल्याने याठिकाणी सिमेंट काँक्रिटचा रस्ता बनवण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. परंतू केडीएमसी प्रशासनाकडून अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचे दिसत आहे.
त्याचा फटका याठिकाणी असणाऱ्या नामांकित रुग्णालयातील रुग्णांसह त्याशेजारी असलेल्या गृहसंकुलातील शेकडो रहिवाशांना बसत आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या खड्ड्यांच्या समस्येने स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्यातच गणपती येण्यासाठी अवघ्या तीन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या पार्श्वभमीवर गणपती येण्यापूर्वी हा रस्ता सुस्थितीत न आणल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा इथल्या स्थानिकांनी केडीएमसीला केलेल्या तक्रारीत दिला आहे. आता त्याची दखल घेऊन तरी केडीएमसी प्रशासन हा रस्ता सुस्थितीत आणते का हे पाहावे लागेल.