कल्याण दि..13 डिसेंबर :
कल्याण पूर्वेतील विकासकामे महापालिका प्रशासनाने तातडीने मार्गी लावावीत अशी आग्रहाची मागणी आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी केली आहे. कल्याण पूर्वेतील विविध प्रश्न आणि मुद्द्यांबाबत गायकवाड यांनी आज केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. (Get the development works in Kalyan East started immediately – MLA Sulabha Gaikwad met KDMC Commissioner)
या बैठकीत कल्याण पूर्वेतील यू टाईप रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पाणी प्रश्न, क्रिडा संकुल, मालमत्ता कर, रुग्णालय आदी महत्त्वाच्या विषयांवर आमदार गायकवाड यांनी आयुक्तांशी चर्चा केली. तर आमदार सुलभा गायकवाड यांनी केलेल्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी यावेळी दिले आहे.
या महत्त्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा…
तिसगाव नाका ते काटेमानिवली नाका या यु टाईप २४ मीटर (८०फूट) रस्त्याच्या बायोमेट्रीक सर्व्हेची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच कल्याण पुर्वेतील तिसगाव नाका ते काटेमानिवली नाका या यु टाईप २४ मीटर (८०फूट) रस्त्याचे काम जलद गतीने होण्यासाठी करण्यासह नागरिकांचे पुनर्वसन करावे.
• कल्याण पूर्व येथील १०० फुटी रोडलगत रुग्णालया करिता (आरक्षण क्र. २८३) आरक्षित ३०,००० चौ.मी. जागा अधिग्रहण करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करावी,
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य शिवस्मारक कल्याण पूर्वेतील मराठा कोळशेवाडी येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रिडांगण येथे बांधावे..
कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रिडांगण आणि त्यासमोरील राजर्षी शाहू उद्यान एकत्र करून यु टाईप रस्ता रुंदीकरण करतांना गणपती मंदिर चौक,मराठा कोळशेवाडी ते सिद्धार्थनगर स्कायवॉक असा समांतर रस्ता तयार करावा.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता कर, पाणी बिलाची थकबाकीसाठी आकारण्यात येणारे दंड/व्याज १००% माफ करून अभय योजना सुरु करावी…
१०० फुटी रोडलगत क्रीडासंकुलासाठी आरक्षित जागेची अधिग्रहण प्रक्रिया तातडीने सुरु करून क्रीडासंकुल उभारण्याकरिता लागणाऱ्या निधीचा डीपीआर राज्य शासनाकडे सादर करावा.
चिंचपाडा, आशेळे, माणेरे, द्वारली, नांदिवली, वसार परिसरातील अमृत योजनेअंतर्गत जलवाहिनी आणि जलकुंभ बनविण्याच्या कामाला गती देणे.
चिंचपाडा, आशेळे, माणेरे, द्वारली, नांदिवली, वसार या नव्याने समाविष्ट ग्रामीण भागात पथदिवे बसविणे.
•RDSS योजनेअंतर्गत प्रस्तावित २२/११ के.व्ही. उपकेंद्रासाठी ३००० चौ.मी. जागा उपलब्ध करून देणे.
वाढती लोकसंख्या लक्षात घेता प्रभाग क्र.१०० तिसगाव गावठाण, सर्व्हे नं.८६ आरक्षण क्र.४४३ येथे तातडीने जलकुंभ बांधणे.
•नवी मुंबई महानगरपालिका आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये ५०० चौरस फुटापर्यंत घरांवरील मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवावा.
“४-जे” प्रभाग क्षेत्र अंतर्गत घनकचरा विभागात कार्यरत ५० स्वच्छता कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत समावून घेणे.
कल्याण पुर्वेतील विशेषतः चिंचपाडा, आशेळे, माणेरे, द्वारली, नांदिवली, वसार परिसरामधील पाणी समस्या तातडीने सोडवण्यासाठी योग्य त्या उपयायोजना करून पाणीसमस्या संपुष्टात येईपर्यत दररोज टॅकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करावा.