डोंबिवली दि.28 जानेवारी :
भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भारतीय सैनिकांना मानवंदना देण्यासाठी डोंबिवलीतील “रनर्स क्लॅन” ग्रुपतर्फे गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली असे ६० किलोमिटरचे अंतर धावून पार करण्यात आले. यावेळी डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांचे कौतुक केले.
गेल्या महिनाभरापासून अथक परिश्रम घेत 22 धावपटू लक्ष्मण गुंडप यांच्या मार्गदर्शनाखाली “एक दौड वीर जवानों के लिये” जय्यत तय्यारी करीत होते. “गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली” अशा प्रकारची ही पहिलीच दौड होती जी डोंबिवलीकरांसाठी ही ऐतिहासिक आणि अभिमानाची बाब ठरली. तर आमदार रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणादरम्यान अशा कार्यक्रमाची आणि समाजात आरोग्याप्रती जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगत डोंबिवलीतील खेळाडूंना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आपण सदैव हजर असल्याचे आश्वासन दिले.
डोंबिवलीमधील कल्याण डोंबिवली रनर्स, चॅम्पियन्स ग्रुप, पवन सर अँड ग्रुप, सुहास सर अँड ग्रुप आणि डोंबिवलीकर नागरिकांनी या धावपटूंना प्रोत्साहित करण्यासाठी काही किलोमीटर यामध्ये सहभाग घेतल्याची माहिती लक्ष्मण गुंडप यांनी दिली. तसेच “एक दौड वीर जवानों के लिये” चे दरवर्षी आयोजन करण्याचा मानसही व्यक्त केला.