कल्याण पश्चिमेत काही प्रभागात कर्मचाऱ्यांचे आंदोलन
कल्याण दि.23 जून :
कंत्राटी कर्मचारी आणि संबंधित कंपनीमधील वादामुळे कल्याणात आज पुन्हा एकदा कचरा उचलण्याचे काम बंद आंदोलन करण्यात आले. कंत्राटदाराकडून वेळेवर पगार मिळत नसल्याने 50 सफाई कर्मचाऱ्यांनी अचानकपणे आज सकाळी कचरा उचलायचे काम बंद केले.
कल्याण पश्चिमेतील ब प्रभाग क्षेत्रातील 3 प्रभागात खासगी कंत्राटदारामार्फत कचरा उचलण्याचे काम देण्यात आले आहे. मात्र संबंधित कंपनीकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार न देण्यासह अर्धवट पगार मिळत असल्याचे सांगत आज सकाळी या कंत्राटी कामगारांनी आंदोलन सुरू केले. कल्याण पश्चिमेतील या 3 प्रभागातील कचरा न उचलता त्याशेजारी कचऱ्याच्या गाड्या नेऊन उभ्या करून ठेवल्या. त्यामुळे तिन्ही प्रभागात सकाळपासून रस्त्यावर कचरा तसाच पडलेला होता.
महापालिका कर्मचाऱ्यांइतकेच काम करूनही आम्हाला कंत्राटदाराकडून वेळेमध्ये योग्य प्रकारे पगार दिला जात नसल्याचे या कर्मचाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच जोपर्यंत आमचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचेही या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान यासंदर्भात महापालिकेचे घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्याशी संपर्क साधला असता हा कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांमधील वादामुळे हे आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले. कामामध्ये अनियमितता आढळून आल्याने कंत्राटदाराला पालिकेने दंड केला. ज्यामुळे कंत्राटदाराने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली,जी अत्यंत चुकीची बाब आहे. यापूढे असे प्रकार घडल्याचे निदर्शनास आल्यास कंत्राटदारावर कारवाई करण्याचा इशाराही कोकरे यांनी दिला आहे.