केतन बेटावदकर
कल्याण – डोंबिवली दि.३० ऑक्टोबर :
गेल्या काही महिन्यांपासून कल्याण डोंबिवलीतील स्वच्छता आणि कचरा समस्येने पुन्हा एकदा डोकं वर काढलं होतं. मात्र प्रशासनाकडून आवश्यक तेवढे प्रयत्न होताना काही दिसत नव्हते. परंतु आधी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि नंतर मग खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या झाडाझडतीनंतर केडीएमसी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे. शहर अस्वच्छ करणाऱ्या कल्याण डोंबिवलीतील विविध दुकानदार आणि आस्थापनांकरून आर्थिक दंड वसूल करण्यात येत असून कचरा वर्गीकरण न करणाऱ्या आणि रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा केडीएमसी प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
नागरिक आणि प्रशासनामधील संवाद पुनर्स्थापित होणे अत्यावश्यक…
कल्याण डोंबिवली महापालिकेत काही महिन्यांपूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या झाल्या. मात्र घनकचरा व्यवस्थापन विभाग वगळता इतर विभागातील अधिकाऱ्यांच्या बदलीचा तसा थेट नागरिकांवर परिणाम जाणवला नाही. परंतु घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि कल्याण डोंबिवलीतील नागरिक यांचा गेल्या काही वर्षांत थेट संबंध प्रस्थापित झाला होता. या विभागाचे तत्कालीन उपायुक्त रामदास कोकरे यांनी आपल्या लोकाभिमुख कामातून कल्याण डोंबिवलीकरांची मनं जिंकली होती. त्यामुळे साहजिकच कोकरे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी येणाऱ्या अधिकाऱ्याची कोकरे यांच्याशी तुलना होणे हे स्वाभाविक होते आणि झालेही तसेच.
कचरा – अस्वच्छतेबाबत आलेली मरगळ झटकल्याचे दिसतेय…
रामदास कोकरे यांच्यानंतर अतूल पाटील यांची घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त म्हणून शासनाकडून नियुक्ती करण्यात आली. मात्र रामदास कोकरे यांच्याशी कल्याण डोंबिवलीतील नागरिक, सामाजिक संस्थांचा ज्याप्रकारे संवाद आणि संपर्क होता तो नव्या अधिकाऱ्याकडून ठेवला जात नसल्याचे लोकं उघडपणे बोलू लागली. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील थांबलेल्या संवादाचा परिणाम कल्याण डोंबिवलीतील कचरा आणि अस्वच्छतेच्या रूपातून दिसू लागला. कल्याण डोंबिवलीत पूर्वी केवळ ठराविक ठिकाणीच दिसणाऱ्या कचऱ्याच्या आणि अस्वच्छतेने हळूहळू आपले हातपाय पसरवायला सुरुवात केली. आणि परिस्थिती हाताबाहेर जातेय की काय असे वाटत असतानाच आधी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी शहराच्या अस्वच्छतेवरून केडीएमसी प्रशासनावर ताशेरे ओढले. तर त्यापाठोपाठ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही शहरातील स्वच्छतेच्या मुद्द्यावर प्रशासनाची कान उघाडणी केली. आणि या दोन्हींच्या एकत्रित परिणामामुळे अखेर केडीएमसी प्रशासनाने कचरा आणि स्वच्छतेबाबत आलेली मरगळ झटकल्याचे दिसून येत आहे.
नागरीकांच्या मनात आपलेपणा तर अधिकाऱ्यांच्या मनात इच्छाशक्ती आवश्यक…
गणेशोत्सवापासून केडीएमसी प्रशासनाने सुरू केलेल्या विविध मोहिमा आता काहीशा वेग घेताना दिसत आहेत. हा एकप्रकारे नक्कीच सकारात्मक बदल असून तो केवळ कायमस्वरूपी सुरू राहण्यासोबतच त्यात दिवसागणिक प्रगतीही होणे गरजेचे आहे. तर नागरिकांनी रस्त्यांवर कचरा टाकणे आणि केडीएमसीने सतत स्वच्छता मोहिमा राबवून तो उचलत राहणे हा काही कायमस्वरुपी उपाय नाहीये. त्यासाठी कल्याण डोंबिवलीतील नागरिकांनी ओला सुका कचरा वर्गीकरण, रस्त्यावर नाही तर कचऱ्याच्या गाडीतच कचरा टाकणे आदी सवयी अंगी बाळगणे आवश्यक आहे. आणि केडीएमसी प्रशासनानेही नागरिकांना या सवयी होण्यासाठी आवश्यक असणारी पोषक परिस्थिती बनवली पाहिजे. कल्याण आणि डोंबिवली ही दोन्ही शहरे आपलीच असून ती स्वच्छ – सुंदर करणे ही माझीही जबाबदारी असल्याची भावना आणि आपलेपणा नागरीकांच्या मनात जागृत होणे गरजेचे आहे. तर कल्याण डोंबिवली महापालिकेत येणाऱ्या अधिकाऱ्यांनीही या शहरांसाठी चांगले काम करण्याची इच्छाशक्ती दाखवली पाहिजे. या दोन्हींचा मेळ घातला तर कचरा आणि अस्वच्छतेची समस्या सुटण्यास वेळ लागणार नाही.
– केतन बेटावदकर