कल्याण दि.16 ऑगस्ट :
कल्याणातील सार्वजनिक गणेशोत्सव आणि एकात्मतेचे प्रतिक असलेल्या मेळा संघ यंदा 97 व्या वर्षात पदार्पण करत आहे. या मेळा संघाच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये अध्यक्षपदी कुंभारवाडा मित्र मंडळ मेळा क्रमांक 9 चे धडाडीचे कार्यकर्ते श्रीधर मोहन मगर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. (Public Ganeshotsav Mela Sangh: Sridhar Magar as President and Parag Teli as Working President)
तर कार्याध्यक्षपदी पराग बाळकृष्ण तेली, सचिवपदी विजय वसंत निकते, उपाध्यक्षपदी मंदार काळे, कोषाध्यक्षपदी कार्तिकेय तन्ना, सहसचिवपदी बाळा सोनवणे यांच्यासह इतर कार्यकारणी सभासद – सल्लागार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
असा आहे सार्वजनिक गणेशोत्सव मेळा संघाचा इतिहास…
सार्वजनिक गणेशोत्सव मेळा संघाची स्थापना 1928 मध्ये झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकं लोक एकत्र येण्याच्या उद्देशाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी पुण्यापाठोपाठ ऐतिहासिक कल्याण नगरीतही सार्वजनिक गणेशोत्सवाची बिजे रोवली. या उत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि या समाज प्रबोधनातून सर्व 18 पगड जातीचे लोक एकत्र यावे. जेणेकरून त्याचा फायदा भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी व्हावा हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.
कल्याणातील सर्व समाज एकत्र आले आणि इतिहास घडला…
कल्याणमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाल्यानंतर 1928 च्या दशकांत समाजातील सर्व जातीचे म्हणजेच तेली मंडळी, धनगर समाज, कोळी समाज, वाणी समाज, गुजराती समाज, न्हावी समाज, कासार समाज, माळी, समाज, सोनार समाज, ब्राह्मण समाज, कुंभार समाज अशा सर्व समाजातील लोकांनी एकत्र येत मेळा संघाची स्थापना केली. थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 36 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा त्यामध्ये समावेश होता.
कल्याण – पुण्याची त्याकाळी सासर आणि माहेर अशी ओळख…
पुण्याचे थोरले बाजीराव पेशवे यांची सासुरवाडी कल्याण असल्याने कल्याण – पुण्याची त्याकाळी सासर आणि माहेर अशी ओळख होती. त्या अनुषंगाने पुण्यामधील गणपती हे दहा दिवसाचे असत आणि ते सर्वांना बघता यावे, तेथील विसर्जन मिरवणुकीचा सर्वांना आनंद घेता यावा यासाठी कल्याण शहरातील मेळा मंडळींचे गणपती हे परिवर्तन एकादशी म्हणजेच आठव्या दिवशी विसर्जन करत असत . आजही ही प्रथा सुरू असून मेळा संघाचे यंदा 97 वे वर्ष आहे.
सालाबादप्रमाणे दरवर्षी श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी मेळा संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. त्यात विविध विषयांसोबतच कल्याणमधील सामाजिक जडण घडणीबाबतही चर्चा होते. तसेच दरवर्षी नवीन पदाधिकारी मंडळाची निवड होत असते. त्यानुसार ही नविन कार्यकारिणी अस्तित्वात आली आहे.