
माणगाव, निळजे तलावासह खिडकाळी शिवमंदिर सुशोभीकरण कामाची केली पाहणी
कल्याण डोंबिवली दि. 16 फेब्रुवारी :
आधी मुंबई मग त्यानंतर नवी मुंबईप्रमाणे आता तिसरी मुंबई जर कुठे होणार असेल तर कल्याण डोंबिवलीत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत त्यादृष्टीने अधिकाधिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आपण काम करत असल्याची माहिती कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण विधानसभेच्या माणगाव तलाव सुशोभीकरणाच्या भूमीपूजन समारंभात ते बोलत होते. (Future third Mumbai to be held in Kalyan Dombivli – Kha. Dr. Srikant Shinde)
अवघ्या 15 मिनिटांमध्ये बाहेर पडता येणार…
बदलापूरपासून ते थेट नवी मुंबई एअरपोर्टपर्यंत ॲक्सेस कंट्रोल मार्ग बांधण्यात येत असून तो कल्याण लोकसभेतील कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर असा समांतर पद्धतीने उभारण्यात येणार आहे. जेणेकरून या मार्गावर राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला शहराबाहेर जायचे असल्यास अवघ्या 15 मिनिटांमध्ये बाहेर पडता येणार आहे. भविष्यामध्ये नवी मुंबई एअरपोर्ट हेच सध्याच्या मुंबई एअरपोर्टप्रमाणे पूर्ण क्षमतेने कार्यरत होणार असल्याने कल्याण डोंबिवली परिसर हा तिसरी मुंबई नावारूपाला येणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
मतदारसंघातील विकासकामं कधीही थांबणार नाहीत…
या कल्याण लोकसभा मतदारसंघात एकीकडे मेट्रोचे काम सुरू असून नागरिकांना काही काळ त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. एकदा ही मेट्रो सुरू झाली की वाहतूक कोंडीचा त्रास संपून अगदी सहजपणे ठाणे, मुंबई किंवा नवी मुंबईच्या दिशेने आपण जाऊ शकतो. गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्य शासनाने इथला 27 गावांच्या मालमत्ता कराचा प्रश्न असो, 27 गावांतील कर्मचाऱ्यांचा प्रश्न असो की 1960 पासून रखडलेल्या मोबदल्याचा, संत सावळराम महाराज स्मारक, आगरी कोळी भवन हे सर्व प्रश्न अत्यंत कमी वेळेमध्ये सोडवून आपल्याला दिलासा दिल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले. आपल्यामार्फत ही अशी सर्वच विकासकामं सुरू असून ती कधीही थांबणार नाही आणि याच कामांच्या विश्वासावर लोकसभा निवडणुकीत आपण सर्वांनी तब्बल 86 हजारांच्या मताधिक्याने निवडून दिले. तर विधानसभा निवडणुकीत राजेश मोरे यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला 67 हजारांनी विजयी केले. राजेश मोरे यांच्या विजयाने बाकी इतर सर्व जण अवाक झाले असले तरी आपण मात्र त्यांच्या विजयाबाबत ठाम खात्री बाळगून होतो असे सांगतानाच लोकांना वायफळ चर्चा आणि बडबड नको असते तर काम पाहिजे असते अशा शेलक्या शब्दांमध्ये खा.डॉ. शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला.
दरम्यान कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील माणगाव येथील तलावाच्या सुशोभीकरण कामाचे भूमीपूजन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तर याआधीपासून सुरू असलेल्या निळजे तलाव आणि खिडकाळी येथील प्राचीन शिवमंदिर सुशोभीकरणाच्या कामाचा खा. डॉ. शिंदे यांनी सखोल पाहणी करत आढावाही घेतला.
यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, 27 गाव संघर्ष समितीचे गुलाब वझे, दत्ता वझे, केडीएमसी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.