
‘उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सल्ला’
कल्याण दि.29 ऑगस्ट :
उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांनी एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे असे मत केंद्रीय सामाजिक विकास मंत्री रामदास आठवले यांनी कल्याणात व्यक्त केले. कल्याणातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते देवचंद अंबादे यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी ते कल्याणात आले होते. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटला पाहिजे. अशा पध्दतीचे वाद आपल्याला चालणार नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी आपल्याला प्रयत्न करायचा असल्याचे सांगत नारायण राणे यांच्यावरील कारवाई अन्यायकारक असल्याचेही आठवले यांनी सांगितले. तर नारायण राणे यांचे पूर्ण आयुष्य शिवसेनेत गेले असल्याने त्यांची भाषा ही सेनेचीच भाषा आहे. शिवसेनेने त्यांचे वक्तव्य एवढ्या गंभीरपणे घेण्याची गरज नव्हती. दोघांनीही एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केली.
महायुतीसाठी अद्यापही वेळ गेलेली नाही…
तर राज्याच्या राजकारणात शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादीने महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता स्थापन केली आहे. अनेक वर्षे शिवसेना भाजप एकत्र राहिले असून महायुतीची अद्याप अजूनही वेळ गेलेली नसल्याचेही सूचक वक्तव्य आठवले यांनी केले. शिवसेना, भाजप आणि आरपीआय महायुती सरकार पुन्हा येऊ शकते, अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावरही पुन्हा चर्चा होऊ शकते. या सर्व विषयांवर एकत्र बसून पुन्हा काही मार्ग काढता येतो का त्यावर चर्चा होऊ शकते असे सांगत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा दोन्ही पक्षांना एकत्र येण्याची साद घातली आहे. त्याला नेमका कसा प्रतिसाद मिळतो हे येत्या काळातच स्पष्ट होईल.
या अमृत महोत्सवी सोहळ्याला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड, आमदार विश्वनाथ भोईर, उपमहापौर जगदीश गायकवाड, सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, उद्योजिका पद्मश्री कल्पना सरोज यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.