कल्याण दि. 26 जानेवारी :
कल्याण पूर्वेच्या सम्राट अशोक विद्यालयात साजरा झालेला आजचा प्रजासत्ताक दिन काही औरच होता. 96 वर्षांच्या वृत्तपत्र विक्रेत्या आजीच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. तिरंगा फडकवून आपल्या आयुष्याचे सार्थक झाले अशी भावनिक प्रतिक्रिया या अजीबाईंनी यावेळी दिली.
पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचालित सम्राट अशोक विद्यालयात प्राथमिक माध्यमिक सम्राट अशोक इंग्लिश स्कूल आणि वाय सी इंग्लिश शाळेमध्ये 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा झाला. गेल्या 70 वर्षांपासून वृत्तपत्र आणि कॅलेंडर विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कल्याणच्या आजीबाई उषा पांडुरंग केतकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले.
आपल्या भाषणात आजीबाई म्हणाल्या की शिक्षणाचे महत्त्व फार आहे. आज तिरंगा झेंडा फडकवून जीवनाचे सार्थक झाले. मला खूप आनंद झाला. विशेष म्हणजे आजीबाईंनी कार्यक्रमालासुद्धा कॅलेंडर विकण्यास आणलेले होते. जे शिक्षकांनी विकत घेतले. शाळेतील एमसीसीच्या विद्यार्थ्यांनी कवायत संचलन करून तिरंगी ध्वजास सलामी दिली. तर प्रियंका जाधव या विद्यार्थिनीने भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचन केले. शिक्षकांनी 7 हजार 700 रुपये जमा करून उषाबाई केतकर यांना यावेळी आर्थिक मदत केली. संस्थेचे अध्यक्ष पी. टी. धनविजय, मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, सुजाता नलावडे, संतोष जाधव, पंकज दुबे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. तर विद्यार्थी आणि पालक कार्यक्रमाला ऑनलाइन उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी केले तर संतोष कदम यांनी आभार व्यक्त केलेत.