
डोंबिवली दि. ८ मे :
डोंबिवलीजवळील नदिवली-संदप गावात खदानीमध्ये बुडून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये दोन महिलांसह तिघा चिमुरड्यांचा समावेश असून पाण्याच्या टंचाईतून ही भयानक दुर्घटना घडल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
नांदिवली, संदप, देसलेपाडा,भोपर या गावांत पाण्याची प्रचंड टंचाई आहे. या गावाजवळच्या देसले पाड्यातील गायकवाड कुटुंबियांमधील मीरा आणि अपेक्षा या दोघी जणी शनिवारी संध्याकाळी साडेचार-पाचच्या सुमारास जवळच असलेल्या खदानीत कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत 3 मुलेही होती. त्यावेळी पाण्यात उतरलेल्या मुलांना वाचवण्यासाठी आजी मिराबाई आणि अपेक्षा यांनी स्वतःला पाण्यात झोकून दिले. मात्र पाणी प्रचंड खोल असल्याने मयुरेश आणि मोक्ष यांच्यासह मिराबाई आणि अपेक्षाही त्यात बेपत्ता झाल्या.
दरम्यान खदानीजवळ असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी हा प्रकार पाहिल्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांना फोन करून ही माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत काही तासांनी या सर्वांना बाहेर काढले. त्यांना तातडीने केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु तेथील डॉक्टरांनी या सर्वांना मृत घोषित केले. या घटनेनंतर नांदिवली परिसरात शोककळा पसरली असून मानपाडा पोलिसांनी या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली आहे.