मॅरेथॉनच्या माध्यमातून सामाजिक संदेशासह आरोग्याबाबत जनजागृती
कल्याण दि.10 फेब्रुवारी :
मॅरेथॉन स्पर्धेच्या पटलावर कल्याण शहराच्या लवकरच एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणच्या माध्यमातून 42 किमीच्या पूर्ण मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून ठाण्यापलिकडील ही पहिलीच पूर्ण मॅरेथॉन असेल अशी माहिती रोटरीतर्फे एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. रविवार 18 फेब्रुवारी 2024 ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे.
रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणतर्फे गेल्या 3 वर्षांपासून अर्ध मॅरेथॉनचे आयोजन केले जात असून त्याला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभुमीवर आम्ही ही पूर्ण मॅरेथॉन भरविण्याचा निर्णय घेतला असून त्यामध्ये सुमारे अडीच हजार स्पर्धक सहभागी होतील असा विश्वास यावेळी रोटरीयन आणि कल्याणचे मॅरेथॉनमॅन दिलीप घाडगे यांनी व्यक्त केला. कल्याण पश्चिमेच्या गांधारी पुल परिसरातील न्यू रिंगरोडपासून या मॅरेथॉनला सुरुवात होईल. पूर्ण मॅरेथॉन ही 42 किलोमीटरची असणार असून त्यामध्ये 35 स्पर्धक सहभागी होणार आहेत. त्यापैकी 12 स्पर्धक हे जगातील सर्वात कठीण दक्षिण आफ्रिकेच्या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये पात्र ठरण्यासाठी धावणार असल्याचे घाडगे यांनी सांगितले.
एक हजार जणांना मोफत कृत्रिम हात-पायांचे वितरण…
तर रोटरी क्लबतर्फे कल्याणात कायम स्वरुपी दिव्यांग केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी साधारणपणे एक हजार दिव्यांगांना मोफत कृत्रिम हात आणि पायांचे मोफत वितरण केले जाते. या सामाजिक उपक्रमासाठी निधी उभारण्याचे काम या मॅरेथॉनच्या माध्यमातून होत असल्याची माहिती रोटरीच्या न्यू कल्याण क्लबचे अध्यक्ष कैलास देशपांडे यांनी यावेळी दिली. त्यासोबतच हॅपी स्कूल, मोफत लायब्ररी, मोफत सायकल वाटप आदी सामाजिक उपक्रमही आम्ही राबवत असल्याचे देशपांडे यांनी यावेळी सांगितले.
व्हील चेअर रनरचाही सहभाग…
तसेच या पूर्ण मॅरेथॉनचे आणखी एक वैशिष्ट्य असेल ते म्हणजे व्हीलचेअर रनर. यंदाच्या रोटरी पूर्ण मॅरेथॉनमध्ये देशाच्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आदी राज्यांतील 15 व्हील चेअर रनरही सहभागी होणार असल्याची माहिती प्रोजेक्ट चेअरमन दिपक चौधरी यांनी दिली. दिव्यांग व्यक्तींना मदत आणि आरोग्याबाबत जनजागृती अशी दुहेरी सांगड या रोटरी मॅरेथॉनच्या माध्यमातून घालण्याचा प्रयत्नही केला जात असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
खेलो इंडियाअंतर्गतही नोंदणी…
कल्याणातील या पूर्ण मॅरेथॉनची केंद्र सरकारच्या खेलो इंडियाअंतर्गतही नोंदणी करण्यात आली आहे. ही मॅरेथॉन TDAA (Thane District Athlete Association) प्रमाणित असून गांधारी ब्रीज, नवीन रिंग रोड, कल्याण पश्चिम येथून प्रारंभ होईल. धावायच्या मार्गावर जागोजागी पाणी, एनर्जी बुस्टर्स यांची सोय करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला बिब, टीशर्ट, मेडल देण्यात येईल अशी माहितीही आयोजकांनी यावेळी दिली.
2 हजार 500 जणांना कृत्रिम हात – पायाचे वाटप…
कल्याणातील रोटरी दिव्यांग सेंटरमध्ये (RDC) कृत्रिम पाय (जयपूर फूट) बनविले जातात. आणि गरजू लाभार्थ्यांना विनामूल्य प्रदान केले जातात. गेल्या ४ वर्षापासून २ हजार ५०० हून अधिक लाभार्थ्यांना हे कृत्रिम अवयव देण्यात आल्याची माहिती रोटरीयन निखिल बुधकर यांनी दिली. रोटरीचे हे दिव्यांग सेंटर (RDC) दर शनिवार आणि रविवारी सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत कार्यरत असते.