Home ठळक बातम्या अग्निशमन सप्ताह विशेष; केडीएमसी अग्निशमन दलाकडून प्रदर्शनाद्वारे जनजागृती

अग्निशमन सप्ताह विशेष; केडीएमसी अग्निशमन दलाकडून प्रदर्शनाद्वारे जनजागृती

कल्याण दि.3 एप्रिल :
सध्या अग्निशमन दलाचा सप्ताह सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून केडीएमसी अग्निशमन दलातर्फे प्रदर्शनाद्वारे जनजागृती केली जात आहे. या प्रदर्शनाला नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.(Fire Week Special; KDMC Fire Department creates awareness through exhibition)

दरवर्षी 14 ते 20 एप्रिल हा संपूर्ण राज्यभरात अग्निशमन सप्ताह साजरा केला जातो. ज्यामध्ये अग्निशमन दलाकडील अत्याधुनिक यंत्रणा- साधन सामुग्री प्रदर्शन, शहरातील सोसायटींमध्ये जाऊन रहिवाशांमध्ये जनजागृती, सायकल रॅली आदी उपक्रमांचा समावेश असल्याची माहिती केडीएसमीचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. तसेच याच सप्ताहाचा भाग म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन दलाच्या आधारवाडी येथील मुख्यालयात एका प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून येत्या दिवसांत पुढील सर्व अग्निशमन केंद्रांमध्ये अशाच प्रकारचे प्रदर्शन राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तर अग्निशमन दलाने या प्रदर्शनामध्ये आग लागल्यानंतर ती विझवण्यासाठी, अपघात किंवा मोठी दुर्घटना झाल्यानंतर त्यामध्ये बचाव कार्य करण्यासाठी, इमारतीखाली अडकलेल्या – इमारतीच्या लिफ्टमध्ये कोणी अडकल्यानंतर संबंधित व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रणा आणि साधन सामुग्री ठेवण्यात आली आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी अनेक नागरिक तसेच परिसरातील नामांकित शाळांचे विद्यार्थी येत असून उपस्थित अग्निशमन कर्मचाऱ्यांकडून त्यांना त्याबाबत माहितीही दिली जात आहे.

दरम्यान या अग्निशमन सप्ताहाचा एक भाग म्हणून येत्या रविवारी 6 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता अग्निशमन सुरक्षा सायकल रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. आधारवाडी येथील मुख्य अग्निशमन केंद्रापासून ही सायकल रॅली निघणार असून दुर्गाडी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मोहम्मद अली रोड, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानमार्गे मुरबाड रोड, प्रेम ऑटो, बिर्ला कॉलेज, खडकपाडा, आधारवाडी चौक मार्गे पुन्हा मुख्य अग्निशमन केंद्रात त्याचा समारोप होणार असल्याचेही नामदेव चौधरी यांनी सांगितले. या सायकल रॅलीमध्ये नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन अग्निशमन दलातर्फे करण्यात आले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा