आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने झाली बैठक
कल्याण दि. 17 ऑक्टोबर :
गेल्या दोन दिवसांपासून मोठे वाहतूक कोंडीला सामोरे जाणाऱ्या कल्याणकर यांना आता या वाहतूक कोंडीतून मिळणार आहे सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत अवजड वाहनांना कल्याण शहरात प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे वाहतूक कोंडीच्या या पार्श्वभूमीवर आमदार विश्वनाथ भोईर यांनी पुढाकार घेत केडीएमसी आयुक्त वाहतूक पोलीस आणि पोलीस प्रशासनाची तातडीची बैठक बोलावली होती. त्यामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
कल्याण शहरात गेल्या दोन दिवसांपासून अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी होत आहे. कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकापासून सुरू होणाऱ्या या वाहतूक कोंडीची झळ थेट पत्रीपुलांपर्यंत बसत आहे. मुख्य रस्त्यांसोबतच शहरातील अंतर्गत जोड रस्ते आणि छोट्या छोट्या गल्ल्याही या वाहतूक कोंडीतून सुटल्या नाहीत.
ही बाब जाणवल्यावर आणि याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आल्यानंतर कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी तातडीने केडीएमसी मुख्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीला केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे , ट्रॅफिकचे एसीपी मंदार धर्माधिकारी यांच्यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.
त्यामध्ये कल्याण शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीला गर्दीच्या वेळेत सुरू असणारी अवजड वाहनांची वाहतूक कारणीभूत असल्याचे आमदार भोईर यांनी यावेळी निदर्शनास आणले. तसेच शिळफाटा, पडघा, भिवंडी आणि मुरबाड दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना कल्याण शहरात प्रवेशबंदी करण्याची सूचनाही त्यांनी केली.
त्यानुसार आता कल्याण शहरात सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली. त्यासोबतच पत्रिपुल पासून ते दुर्गाडी चौकापर्यंत असणाऱ्या क्रॉसिंगवर वाहतूक पोलिसांची संख्या वाढवणे, दुर्गाडी देवीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी लालचौकी येथील शारदा मंदिर शाळेच्या आणि वासुदेव बळवंत फडके मैदानात पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देणे, या दोन्ही ठिकाणांहून दुर्गाडीसाठी केडीएमटीच्या मोफत बसेस सोडणे आदी निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले.
दरम्यान आमदार विश्वनाथ भोईर यांनी वाहतुकीची ही गंभीर समस्या लक्षात घेऊन केलेल्या या उपाययोजनांमुळे कल्याणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.