
स्वागतयात्रेचे आयोजन पहिल्यांदाच महिला संघटनेकडे
कल्याण दि.19 मार्च :
ऐतिहासिक कल्याण नगरीमध्ये निघणारी यंदाची गुढीपाडवा स्वागतयात्रा नेहमीपेक्षा वेगळी ठरणार आहे. कल्याणच्या नववर्ष स्वागतयात्रेच्या आयोजनाची धुरा यंदा प्रथमच इनरव्हील क्लब या महिला संघटनेने आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यामुळे या स्वागतयात्रेमध्ये नारीशक्तीची गुढी उभारलेली पाहायला मिळणार आहे. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकाही यामध्ये सहआयोजक म्हणून सहभागी होणार आहे. (Female power will be present at the this year’s New Year welcome procession in Kalyan)
येत्या 30 मार्च रोजी गुढीपाडवा सण असून त्यानिमित्त आठवडाभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कल्याण संस्कृती मंच आणि कल्याण इनरव्हील क्लबतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. तर “ऐतिहासिक कल्याण” या थीमवर यंदाची स्वागतयात्रा निघणार असून कल्याणच्या ऐतिहासिक संस्कृतीची झलक चित्ररथांद्वारे पाहायला मिळणार आहे. साधारणपणे 70 ते 80 च्या दरम्यान विविध संस्थांचे चित्ररथ यावेळी सहभागी होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
तर 23 मार्चपासून ते 30 तारखेपर्यंत म्हणजेच गुढीपाडव्यापर्यंतचा संपूर्ण आठवडाभर अनेक संस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. ज्यामध्ये सांगितिक कार्यक्रम, महारंगोळी,दिपोत्सव आदी उपक्रमांचा समावेश असून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले.
असे असणार आहेत कार्यक्रम…
• रविवार दिनांक 23 मार्च संध्याकाळी 5.30 वाजता ‘स्वरांगिणी’ हा सूर-तालाचा अनोखा मिलाफ असलेला गाण्याचा कार्यक्रम प्रबोधनकार ठाकरे सरोवर (काळा तलाव) येथे होणार आहे.
• त्यानंतर त्याच दिवशी त्याच ठिकाणी संध्याकाळी 07.00 वाजता दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. या मधे नागरिकांना सरोवरच्या परिसरात दिवे / पणत्या लावून दीपोत्सव साजरा करायचा आहे.
• शुक्रवार दिनांक 28 मार्चला यशवंतराव चव्हाण मैदान, रामबाग (मॅक्सी ग्राउंड) येथे संस्कार भारती कल्याण शाखा यांच्यावतीने भव्य रांगोळी काढली जाणार आहे. ही रांगोळी सकाळी 11.00 ते रात्री 09.00 वाजेपर्यंत प्रदर्शनासाठी खुली असेल.
• रविवार दिनांक 30 मार्च सकाळी 06.00 वाजता कमिशनर बंगला, सिंडीकेट येथून हिंदू नववर्ष स्वागतयात्रेस आरंभ होईल.
या पत्रकार परिषदेला कल्याण डोंबिवली महानगरपालिका उपायुक्त संजय जाधव, इनरव्हील क्लब ऑफ कल्याणच्या अध्यक्षा डॉ. अर्चना सोमाणी, सचिव ॲड. नीता कदम, प्रकल्प प्रमुख ॲड. अर्चना सबनीस, सहप्रमुख मीनाक्षी देवकर, कल्याण संस्कृती मंचचे अध्यक्ष डॉ. सुश्रुत वैद्य, सचिव अमोल जोशी, कोषाध्यक्ष दीपक चौधरी, सदस्य ॲड. निखिल बुधकर उपस्थित होते.