कल्याण दि.२९ एप्रिल :
मोबाईलच्या अति वापराने लहान मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमतांवर परिणाम होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणातील श्री राम मारुती मंदिर संस्थानतर्फे राबवण्यात आलेल्या बालसंस्कार वर्गाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे.
मोबाईलच्या अति वापराने प्रौढ व्यक्तींसोबत लहानग्यांच्या आयुष्यातही वादळ आणले आहे. त्याच्या अतिवापराने ही मुलं मैदानी खेळ, बैठे खेळ तर पार विसरूनच गेली आहेत. तर त्याचसोबत आपले पिढीजात संस्कारही मागे पडत चालले आहेत. नेमका हाच धागा पकडून कल्याणातील श्री राम मारुती संस्थांनतर्फे बाल संस्कार वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. या संस्कार वर्गाद्वारे लहान मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक क्षमतांचे संवर्धन केले जात असल्याची माहिती संस्कार वर्गाच्या समन्वयक गिरीजा प्रधान यांनी दिली.
यामध्ये गणपती, रामरक्षा, मारुती स्तोत्रांसह श्लोक, पाढे, 1 माळ जप आणि मुलांची बौद्धिक वाढ होण्यासाठी प्रज्ञाविवर्धन स्तोत्रही शिकवली जात आहोत. त्यासोबतच चित्रकला, क्राफ्ट, फुलं आणि बी बियाणे यावरील माहिती, प्राणी – पक्ष्यांची माहिती, गणेश मूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक, सेल्फ डिफेन्स, योगा आदी उपक्रमही या संस्कार वर्गाच्या माध्यमातून घेतले जात असल्याचेही सांगण्यात आले.
या संस्कार वर्गामध्ये चित्रकला- क्राफ्ट सारंग केळकर, अभिनय विश्वास नवरे , निसर्ग आणि हरणांची माहिती श्रेया भानप, गड- किल्ले आणि बी बियाणांची माहिती अश्वमेध प्रतिष्ठानचे अविनाश हरड, सेल्फ डिफेन्सबाबत यश मारवाडी माहिती देत असून गणपती मूर्ती प्रात्यक्षिक दिनेश शेटे, योगासने वर्षा जोशी आणि अध्यात्मिक स्तोत्रं गिरीजा प्रधान यांच्यामार्फत शिकवले जात आहे.