Home ठळक बातम्या ऊर्जा बचतीसाठी आपल्या सर्वांच्या स्वभावात बदल आवश्यक – अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड

ऊर्जा बचतीसाठी आपल्या सर्वांच्या स्वभावात बदल आवश्यक – अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड

केडीएमसी विद्युत विभागाच्या ऊर्जा संवर्धन सप्ताहाला सुरुवात

कल्याण दि.13 डिसेंबर :
ऊर्जा बचत ही काळाची गरज बनली असून ऊर्जा बचत करण्यासाठी आपल्या सर्वांच्याच स्वभावात बदल होणे आवश्यक असल्याचे मत केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी व्यक्त केले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांच्या पुढाकाराने आयोजित ऊर्जा संवर्धन सप्ताहाच्या शुभारंभी कार्यक्रमात ते बोलत होते. (Energy saving requires a change in attitude in all of us – Additional Commissioner Harshal Gaikwad)

संपूर्ण देशभरात 14 डिसेंबर हा ऊर्जा संवर्धन दिन तसेच 14 ते 20 डिसेंबर दरम्यान हा ऊर्जा संवर्धन सप्ताह साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर केडीएमसी विद्युत विभागाकडून दरवर्षी ऊर्जा संवर्धन सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यंदाही केडीएमसी मुख्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये ऊर्जा बचतीबाबत जनजागृती करण्यात आली. ज्यामध्ये आपण सर्व जण कशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून ऊर्जा बचत करून ऊर्जा संवर्धनेमध्ये हातभार लावू शकतो यासंदर्भात विद्युत विभागाकडून मार्गदर्शन करण्यात आले. महापालिकेच्या विद्युत विभागाकडून ऊर्जा संवर्धन सप्ताहात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तीन आकर्षक माहिती पत्रके तयार करण्यात आली आहेत. पहिल्या माहिती पत्रकात “चला एकजुटीने एकदिलाने यशस्वी करूया संवर्धन ऊर्जेचे हे कार्य राष्ट्रहिताचे सामाजिक बांधिलकीचे, दुसऱ्यामध्ये ऊर्जा बचत करण्यासाठी बीईई स्टार मानांकित ऊर्जा कार्यक्षम उत्पादनाद्वारे ऊर्जेची बचतीबाबत आणि तिसऱ्या माहितीपत्रकात सौर ऊर्जा यंत्रणा घरांवर बसवण्यासाठी आवश्यक महावितरण कार्यालयाचे क्रमांक देण्यात आले आहेत.

तर पुढील आठवडाभर विद्युत विभागाकडून कल्याण डोंबिवलीतील विविध सार्वजनिक ठिकाणी आणि गृहसंकुलात ऊर्जा संवर्धन आणि बचतीबातात जनजागृती केली जाणार आहे. ऊर्जा संवर्धन म्हणजे काय, ऊर्जेचा जबाबदारीने वापर करणे म्हणजे काय? यावर भाष्य करताना आपलं घर असो किंवा सार्वजनिक ठिकाण वातानुकूलित यंत्रणेसाठी सर्वाधिक वीज लागते. मात्र आवश्यकता नसताना वीज उपकरणे बंद ठेवल्यास ऊर्जा संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी यावेळी केले.

यावेळी विद्युत विभागाबाबत बनवण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचेही यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून प्रकाशन करण्यात आले. तर ऊर्जा बचत आणि संवर्धनाची महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शपथही देण्यात आली. विशेष म्हणजे सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यालयातील वीजपुरवठा बंद करून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते.

यावेळी केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे, शहर अभियंता अर्चना परदेशी, उपायुक्त अतुल पाटील, प्रसाद बोरकर, केडीएमसी ब्रँड ॲम्बेसेडर आणि महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, मुख्य लेखा परीक्षक पाटील, मुख्य लेखाधिकारी दिग्विजय चव्हाण, न्यू रोटरी क्लब कल्याणचे बिजू उन्नीथन, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, उप अभियंता भागवत पाटील, जितेंद्र शिंदे, जितेंद्र पाटील यांच्यासह केडीएमसीच्या सर्वच विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा