
डोंबिवली दि.21 नोव्हेंबर :
डोंबिवली पूर्वेत असणाऱ्या पाथर्ली स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीचा अचानक भडका होऊन त्यामध्ये एक कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे. गोपाळ अडसुळ वय 51वर्षे असे यात जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शनिवारी 20 नोव्हेंबर रोजी रात्री 11 च्या सुमारास डोंबिवलीच्या पाथर्ली स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी शव (मृतदेह)आणण्यात आले होते. त्याच्यावर गॅस शवदाहिनीद्वारे अंत्यसंस्कार केले जाणार होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या गॅसशवदहिनीचे बटन आणि लायटर तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने तेथील कर्मचारी कापडाचा पेटता बोळा आतमध्ये टाकून शवदाहीनी चालू करत होते. जे की केवळ।त्यांच्याच नव्हे तर अंत्यसंस्कारासाठी आलेल्या व्यक्तींसाठीही अत्यंत धोकादायक बाब होती. मात्र हा धोका पत्करून गोपाळ अडसूळ यांनी स्मशानभूमीत दाखल शवावर अंत्यसंस्कारासाठी कापडाचा पेटता बोळा आत टाकला आणि त्याक्षणी गॅसचा मोठा भडका उडून त्यामध्ये अडसूळ भाजले. या घटनेत त्यांचा चेहरा आणि हाताला दुखापत झाली आहे.
या धक्कादायक प्रकारानंतर स्मशानभूमीतील इतर कर्मचारी आणि काही नागरिकांनी अडसूळ यांना केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण तिथल्या उपस्थित स्टाफकडून देण्यात आल्याने त्यांना कळवा रुग्णालयात नेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
या धक्कादायक घटनेनंतर स्मशानभूमीतील गॅस शवदाहिन्या आणि त्यांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सुमारे 10 दिवसांपासून या गॅस शवदाहिनीत तांत्रिक बिघाड असूनही तो दुरुस्त का केला गेला नाही? याबाबत केडीएमसीच्या संबंधित विभागाला माहिती देण्यात आली होती का? माहिती देण्यात आली असेल तर मग हा तांत्रिक बिघाड दुरुस्त का केला गेला नाही? यांसारखे अनेक गंभीर प्रश्न या घटनेनंतर निर्माण झाले आहेत.