पत्राद्वारे मांडला विविध सामजिक शैक्षणिक कामांचा लेखाजोखा
कल्याण दि.27 एप्रिल :
भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुती- महविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी मतदारांना आपल्या अनोख्या पत्राच्या माध्यमांतून भावनिक साद घातली आहे. तसेच गेल्या काही वर्षांत त्यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या ग्रामीण भागात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखाही मतदारांसमोर मांडला आहे. (Emotional message from indipendent candidate of Bhiwandi loksabha Nilesh Sambare’s letter)
कल्याण लोकसभा मतदारसंघापाठोपाठ त्याला लागून असलेल्या भिवंडी लोकसभेकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याठिकाणी महायुतीकडून भाजपतर्फे कपिल पाटील, महविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांच्यासह जिजाऊ संस्थेचे प्रमुख निलेश सांबरे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. हे तिन्ही उमेदवार आपापल्या परीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा, त्यांना आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी भिवंडी लोकसभेतील मतदारांना उद्देशून लिहिलेलं पत्र काहीसे वेगळे ठरले आहे.
निलेश सांबरे यांनी या पत्राद्वारे विविध ठिकाणी राबवलेले वैद्यकीय उपक्रम, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी बांधलेली शाळा, ग्रामीण भागातील तरुणांसाठी मोफत सुरू केलेली पोलीस अकादमी – यूपीएससी – एमपीएससी क्लासेस , वाचनालये, 130 बेडची सुविधा असलेले रुग्णालय अशा विविध सामाजिक उपक्रमांचा संपूर्ण लेखा जोखा मांडला आहे. तसेच या सर्व गोष्टी सरकारकडून मिळायला पाहीजे होत्या मात्र आपल्यापर्यंत शासकीय योजना कोणी पोहचू देत नसल्याचे सांगत समाज व्यवस्थेवर त्यांनी पत्रामध्ये ताशेरेही ओढले आहेत.
तर आता यापुढे असे होणार नाही, आपण स्वतः विडा उचलला आहे तुमच्या सगळ्यांच्या भविष्याचा आणि हे शिवधनुष्य पेलण्यासाठी भिवंडी लोकसभेतून खासदारकीच्या निवडणूकीत उभे राहिलो आहे. आणि आज मला आपल्या संपूर्ण कुटुंबियांच्या आशिर्वादाची, साथीची गरज आहे अशी भावनिक सादही निलेश सांबरे यांनी घातली आहे.
त्यावर आता भिवंडी लोकसभेतील मतदार कोणाला साथ देतात, कोणाच्या बाजूने उभे राहतात हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.
अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांचे ते पत्र…
प्रिय आजी ,
पत्र लिहिण्यास कारण मी निलेश भगवान सांबरे आपल्या भिवंडी लोकसभा क्षेलातून खासदारकीसाठी उभा आहे. आणि आज मला तुझ्या संपूर्ण कुटुंबाच्या आशीर्वादाची गरज आहे, आठवतंय तुला ज्यावेळी मी तुझ्या मोतीबिंदू झालेल्या डोळ्याच ऑपरेशन केलं तुला सुखरूप घरी सोडले तर तुझा थरथरता हात माझ्या डोक्यावर ठेवून तू काय म्हणाली होतीस, बाळा शंभर वर्षाच आयुष्य लाभू दे रे तुला, तुझे प्रत्येक काम यशस्वी होऊ दे. म्हणून आज जे काम मी हाती घेतोय त्यासाठी त्या कामाच्या यशासाठी तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. आज जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने मी गेली पंधरा वर्षे विनामूल्य सेवा करत आहे. आजी तुला तर माहीतच आहे की आपल्या गावात तुझ्यासारख्या कितीतरी गावकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर घेतले, त्यातून कित्येकांचे ऑपरेशन केले कित्येकांना मोफत चष्मे दिले. तुला आठवतंय कोरोनाची महामारी आली तेव्हा सगळे आपापल्या घरात बसले होते. पण जिजाऊ संस्था मान गोरगरिबांच्या मदतीसाठी दिवस रात्र कष्ट घेत होती. ज्यांना दोन वेळचे अन्न मिळत नव्हते त्यांना मोफत धान्याचे किट वाटत होती.
आठवते तुला ज्यावेळी मला ज्यावेळी मला अंध अपंग दिव्यांग मुल दिसली ना त्यावेळी त्यांच्या भविष्याची चिंता सतावत होती यांच्या पुढच्या आयुष्याचं काय होईल हा प्रश्न झोप लागू देत नव्हता, त्याच वेळी ठरवले या मुलांसाठी माझ्या कुटुंबासाठी त्यांच्या भविष्यासाठी शाळा बांधायची आणि ती शाळा मी उभारली. ज्या शाळेत आज शाळेत 150 होऊन जास्त दिव्यांग विद्यार्थी शिकत आहेत, तेथेच राहत आहेत, त्यांच्या अन्नाची त्यांच्या पोटापाण्याची सगळी व्यवस्था मी केलेली आहे. अनेक जणांनी वर्षानुवर्ष आश्वासन दिली पण ती पूर्ण केली नाही. माझी तरुण मुले बेरोजगार म्हणून रस्त्यावर फिरत असताना मनात मात्र दुःखाचा डोंगर उभा होता. त्यांच्यासाठी काय करावं कसे करावे या प्रश्नांनी झोप लागत नव्हती. आणि मग या तरुणांसाठी मी पोलीस अकॅडमी एमपीएससी यूपीएससी वाचनालय मोफत कोचिंग क्लासेस या सगळ्याची उभारणी केली. आणि आज हाच तरुण वर्ग पोलीस होतोय मोठा शासकीय मोठा शासकीय अधिकारी होतोय. सांगायला आनंद वाटतोय की जिजाऊच्या ह्या उपक्रमामुळे ५००० हून अधिक विद्यार्थी शासकीय सेवेत दाखल झाले आहेत.
आरोग्य क्षेत्रात बघितले तर 24 तास सेवा देणारे हॉस्पिटल मी सर्वांसाठी सुरू केले. 130 बेडची सुविधा असलेल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आज लाखो लोकांनी मोफत उपचार घेतले आहेत. ऍम्ब्युलन्स तर 24 तास सेवेसाठी हजर असते, कितीतरी रक्तदान शिबिर घेऊन अनेकांचे प्राण वाचवले अजूनही रक्तदान शिबिर आपण घेत आहोत. आजी तुझ्यासारख्या तीन लाख लोकांना मोफत चष्मे वाटप केले, पण कधीही कुठलीही अपेक्षा केली नाही.
मला विश्वास आहे , माझ्या बहिणीचा ज्या स्व कष्टाने कमवून आपले कुटुंब चालवले चालवतात कुटुंब चालवतात त्यांना दिलेल्या शिलाई मशीन, त्यांना दिलेल्या पिठाच्या चक्क्या, रोजगाराला हातभार यामुळे आज त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, आणि ताठ मानेने आपले जीवन जगत आहेत.
तुला आठवते मागच्या पावसाळ्यात इथेच बाजूलाच कोसळलेले घर, सगळा संसार मोडून पडला होता. पण कोणी त्या कुटुंबाकडे बघितले नव्हते. त्यावेळी या कुटुंबाच्या मदतीला जिजाऊ आली. त्यांचा मोडून पडलेला संसार पुन्हा उभा केला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान बघून मला समाजकार्य केल्याचे सार्थक वाटले.
आज झाडपोलीला दर रविवारी मी माझ्या आईंसाठी, माझ्या बहिणीसाठी, माझ्या तरुण बांधवांसाठी, प्रत्येक गरजेसाठी बसलेला असतो. कितीतरी हात काम मागायला येतात, किती तरी डोळे मदतीच्या आशेने बघतात, कितीतरी गरजू आपल्या गरजा भागवण्यासाठी येतात. आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करताना मला कुटुंब प्रमुख असल्याचा आनंद मिळतोय. आजी, आज मी स्वतःच्या कमाईतून हे सर्व विश्व उभारले. आपल्या सर्वांना हे सरकारकडून मिळायला हवं, आपल्याला योजना येतात, उपक्रम येतात ते राबवायचे असतात. पण त्या योज़ना आपल्यापर्यंत कोणी पोहोचू देत नाही, कुणी आपल्याला माहिती माहिती देत नाही. पण आता नाही… मी स्वतः विडा उचललाय तुमच्या सगळ्यांच्या भविष्याचा आणि हे शिवधनुष्य पेलण्यासाठी भिवंडी लोकसभेतून खासदारकीसाठी उभा आहे. आणि आता तुमच्या सर्वांच्या वडिलधाऱ्यांच्या आशीर्वादाची तरुणांच्या साथीची मला गरज आहे.
तुझा लाडका मुलगा, निलेश भगवान सांबरे.
Saheb tumhich khasdar Honar satyacha Jay jay kar Honar