Home ठळक बातम्या महावितरणच्या कल्याण मंडलांकडून २ कोटींपेक्षा अधिकच्या वीजचोऱ्या उघड

महावितरणच्या कल्याण मंडलांकडून २ कोटींपेक्षा अधिकच्या वीजचोऱ्या उघड

बदलापुरात ग्रामपंचायतीकडूनच सुरू होती वीजचोरी

कल्याण दि.२६ एप्रिल :
महावितरणच्या कल्याण परिमंडळाततील कल्याण १ आणि २ विभागाला तब्बल २ कोटींहून अधिक रकमेची वीजचोरी उघड करण्यात यश मिळवले आहे. तर ही वीजचोरी करणाऱ्यांमध्ये सामान्य ग्राहक, जीन्स वॉशिंग कारखाना, मिनरल वॉटर कंपनीसह चक्क एका ग्रामपंचायतीचाही समावेश आहे.

कल्याण मंडल कार्यालय १ अंतर्गत उच्चदाब ग्राहकांच्या (थ्री-फेज) वीजपुरवठा तपासणीसाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकाने गेल्या दोन महिन्यात तब्बत १ कोटी ४३ लाख रुपयांच्या ३८ वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. त्यापैकी २९ उच्चदाब ग्राहकांकडून वीजचोरी देयकांचे १ कोटी १७ लाख रुपये वसूलही करत दोघाविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या संकल्पनेतून परिमंडलातील कल्याण एक, कल्याण दोन, वसई आणि पालघर या चारही मंडल कार्यालयांतर्गत उच्चदाब ग्राहकांच्या तपासणीसाठी नियमित कर्मचाऱ्यांची विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. कल्याण मंडल कार्यालय एकच्या विशेष पथकाने उमेशनगर, मलंगगड, गौरीपाडा, नेतीवली, खंबाळपाडा, सोनारपाडा, सागाव, रेतीबंदर, पारनाका आदी भागात तपासणी केली. ज्यामधे ३८ ग्राहकांकडून मीटरमध्ये छेडछाड, रात्रीच्या कालावधीत मीटर बायपास तसेच चेंजओव्हर स्वीचद्वारे सुरू असलेली वीजचोरी उघडकीस आणली.

मुख्य अभियंता औंढेकर, अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता जयश्री भोईर, सहायक अभियंते सुरज माकोडे, जयेश कुरकुरे, दीपाली जावळे तसेच जनमित्र राजेंद्र जानकर, किशोर राठोड, संतोष मलाये, विनोद गिलबिले, नितीन कुंवर, आकाश गिरी, मधुकर चाने, सुभाष डोरे, संतोष मुर्तरकर यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.

 

बदलापुरात ग्रामपंचायतीकडून होणारी २७ लाखांची वीजचोरी उघड…

तर कल्याण मंडल २ अंतर्गत महिला अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने बदलापूर पश्चिमेला धडक कारवाई करत जवळपास १ कोटी १५ लाख रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश केला. विशेष म्हणजे कारवाई करण्यात आलेल्यां ग्राहकांमध्ये चक्क ग्राम पंचायतीचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

उपकार्यकारी अभियंता अनिता चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बदलापूर पश्चिमेतील कारव परिसरात ही तपासणी मोहिम राबवली.
पाणीपुरवठा योजनेसाठी या ग्रामपंचायतीने सुमारे २७ लाख ४६ हजार रुपये किंमतीची १ लाख २४ हजार ८४० युनिट वीज चोरल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली. याशिवाय बाटलीबंद पाण्याच्या कंपनीकडून सुमारे ८६ लाख २८ हजार रुपयांची ३ लाख ९२ हजार २०६ युनिटची तर जीन्स वाशिंग कारखान्याकडून १ लाख ९८ हजार रुपये किंमतीची ९ हजार १८ युनिटची वीजचोरी उघडकीस आल्याचे महावितरणने सांगितले.

दरम्यान या तिन्ही ग्राहकांना चोरीच्या विजेचे देयक भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली असून विहित मुदतीच्या आत देयकाचा भरणा न झाल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर आणि कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांनी या धडक कारवाईबाबत महिला अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाचे कौतूक केले. उपकार्यकारी अभियंता चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंता नेहा ढोणे, जनमित्र रमेश शिंदे, प्रशिक्षणार्थी प्रथमेश जाधव, चालक सुर्यकांत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा