अधिकृत वीज जोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन
कल्याण/वसई/पालघर दि. ३१ ऑगस्ट :
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महावितरणतर्फे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या स्वरुपात त्वरित वीजजोडणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वीज जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार असून सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले.
तात्पुरत्या वीज जोडणीसाठी ही कागदपत्रे आवश्यक…
सार्वजनिक गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीज जोडणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची मंडप परवानगी, पोलिस स्थानक परवाना, विद्युत निरिक्षक यांचे वीजसंच सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी चाचणी अहवाल आणि राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक छायांकित प्रत आदी कागदपत्र आवश्यक आहेत. या कागदपत्रांद्वारे सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या आवश्यक कागदपत्रासह नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधल्यास त्यांना ही तात्पुरत्या स्वरूपातील वीज जोडणी मिळू शकेल.
गणेशोत्सव काळात घ्या ही खबरदारी…
गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारचे वीज अपघात होऊ नये, यासाठी मंडप, रोषणाई आणि देखाव्यांची उभारणी करताना लघुदाब आणि उच्चदाब विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे आदी यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे, मंडपातील वीजसंच मांडणी करताना विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, मंडपातील वीजसंच मांडणी मान्यताप्राप्त विद्युत कंत्राटदारांकडून करून घ्यावी, गणेश मंडळांनी विद्युत सुरक्षा उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये, आपात्कालीन स्थितीकरिता कार्यक्षेत्रातील महावितरणच्या शाखा अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत असे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
याबरोबरच महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राचे १९१२, १८००-२१२-३४३५ आणि १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक ग्राहकांच्या सेवेत २४ तास उपलब्ध असून त्यावरही संपर्क करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.