डोंबिवली दि.16 मे :
येत्या 20 मे रोजी असलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीतील पाचव्या टप्प्यासाठी 24-कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रियेची यंत्रणा सज्ज असून, जास्तीत जास्त लोकांनी मतदान करुन मतदाराचा आपला हक्क बजवावा, असे आवाहन 24-कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी केले.
1 हजार 12 मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही आणि वेब कास्टींग…
24-कल्याण लोकसभा मतदार संघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात 1 हजार 960 मतदान केंद्रे आहेत. त्यातही 10 पेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या आणि जास्त घनता असलेल्या ठिकाणी एकूण 1 हजार 12 मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही आणि वेब कास्टींगची सुविधा पुरविण्यात आली आहे.
प्रत्येक मतदानाचे ठिकाणी आरोग्य सेविका/आशा सेविकांची नेमणूक…
सद्यास्थितीत तीव्र उन्हाळा लक्षात घेता प्रत्येक मतदान केंद्रावर 1 मेडिकल कीट तसेच किमान आवश्यक सुविधांची (पिण्याचे पाणी, रॅम्प, शौचालय इ.) व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक मतदानाचे ठिकाणी आरोग्य सेविका/आशा सेविकांची नेमणूक करण्यात येत आहे.
मतदार स्लिप वाटण्याचे काम पूर्ण…
मतदारांना मतदार यादीतील नोंदीबाबतच्या तपशिलाच्या मतदार स्लिप वाटण्याचे काम पूर्ण झाले आहे. निवडणूककामी 12 मे 2024 रोजी अधिकारी आणि कर्मचा-यांचे द्वितीय प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. अंध दिव्यांग मतदारांना सर्व मतदान केंद्रांवर रॅम्प, व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, “सक्षम प्रणालीद्वारे” विनंती करण्यात आलेल्या दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर ने-आण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
आचारसंहिता भंगासंदर्भात 5 FIR नोंदविण्यात आले…
त्याचप्रमाणे दिव्यांगाना रांगेत उभे न राहता मतदान करता येणार आहे. अंध, दिव्यांग मतदारांना ब्रेल लिपीतील मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सर्व मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्र तळ मजल्यावर घेण्यात आले आहे. आता पर्यंत C Vigil ॲपवर 318 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यांचे निवारणही करण्यात आले आहे. सद्यास्थितीपर्यंत आचारसंहिता भंगाच्या तक्रारी संदर्भात 5 FIR नोंदविण्यात आले आहेत.
याठिकाणी प्रत्येक केंद्रात महिला मतदार कर्मचा-याची नेमणूक…
149 कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघातील 216 मतदान केंद्रात पर्दानशीन (बुरखाधारी) महिला मतदार असल्यामुळे या प्रत्येक केंद्रात महिला मतदार कर्मचा-याची नेमणूक करण्यात आली आहे.
प्रत्येकी 1 दिव्यांग ,महिला आणि युवा बूथ…
24-कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय 1 दिव्यांग मतदार कर्मचा-यांचे मतदान केंद्र 1 पिंकबुथ म्हणजे महिला मतदार कर्मचा-यांचे मतदान केंद्र आणि युवा मतदार कर्मचारी उपलब्ध झाल्यास प्रत्येक मतदार संघनिहाय 1 युवा मतदार कर्मचारी केंद्र मतदानासाठी उपलब्ध राहणार आहे.
मतमोजणी वै.ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात…
24-कल्याण लोकसभा मतदार संघाची मतमोजणी ही सुरेंद्र बाजपेयी बंदीस्त सभागृह, वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे. त्याचप्रमाणे स्ट्राँगरुमची व्यवस्था सावित्रीबाई फुले कला मंदिरातील तळघरात (Basement) करण्यात आली असून, तेथे राज्य पोलीस, राज्य राखीव दल आणि केंद्रीय पोलीस सुरक्षा दल अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.