उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
कल्याण ग्रामीण दि.14 नोव्हेंबर :
जे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले, त्यांना गरिबांच्या व्यथा काय कळणार? मला तुमचे आयुष्य सोन्यासारखे करायचे आहे. राज्य प्रगतीकडे न्यायचे आहे आजवर खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण ग्रामीणमध्ये हजारो कोटीचां निधी आणून गल्ली गल्लीत विकास पोहोचवला आहे. तसंच आता कल्याण ग्रामीण मतदारसंघाच्या आणखी चौफेर विकासासाठी राजेश मोरे यांना निवडून द्या असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण ग्रामीणमधील प्रचारसभेत केले.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारासाठी डोंबिवली पूर्वेकडील नांदिवलीच्या समर्थ नगर परिसरात मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
राजेश मोरे यांच्या रूपाने सर्वांच्या सुखदुःखात धावत जाणारा उमेदवार आपण दिला आहे. इथे जरी तिरंगी लढत दिसत असली तरी प्रत्यक्षात मला फक्त इथे विकासाचा भगवा रंग दिसत आहे. आणि हाच रंग निकालाच्या दिवशी दिसेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करत कार्यकर्त्यांनी मात्र गेल्या वेळेप्रमाणे गाफील न राहता पूर्वीच्या चुका टाळण्याचा प्रेमळ सल्लाही दिला. राज्यात विकासासाठी निधी पडू दिला नाही, आताही विकासकामे थांबणार नाही. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे मिळणारच, लाडका भाऊ त्यांच्या खात्यात पैसे पाठवणार त्यामध्ये कोणी आला तर त्याची गाय केली जाणार नाही . लाडक्या बहिणी योजनेसाठी निधीची तरतूद केली आहे. कारण हा जनतेचा पैसा आहे आणि तो जनतेलाच दिला जाईल. मात्र लाडक्या बहिण योजनेला विरोध करत त्यांच्या मुलाबाळांच्या तोंडातला घास हिरावून खोडा घालणाऱ्यांना मत मागायला आल्यावर जोडा दाखवा अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. तर बदलापूरच्या नराधमाला फाशी दिली हे बरोबर होतं ना असे विचारत त्यांनी यासारखे झटपट निर्णय घेण्यासाठीच महायुतीला पुन्हा एकदा निवडून देण्याचे उपस्थित नागरिकांना आवाहन केले.
कल्याण ग्रामीण जिव्हाळ्याचा विषय…
कल्याण ग्रामीण हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. लोकांनी लोकसभा निवडणुकीत श्रीकांतवर विश्वास दाखवला. आणि श्रीकांतनेही या संधीचे सोने केले. त्याने आपल्या कामातून स्वतःची ओळख निर्माण केली. आता इथे आमदारही आपलाच हवा जेणेकरून मतदारसंघाच्या विकासाची गती आणखी दुप्पट होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उमेदवार राजेश मोरे यांच्या कार्य अहवाल आणि वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघात केलेल्या कामांची माहिती जनतेला दिली. तर कल्याण ग्रामीण बदलतेय असे बॅनर लावणाऱ्या मनसेच्या बॅनरच्या बाजूलाच क्रेडिट दिल्याबद्दल धन्यवादाचे बॅनर लावण्याचे आवाहन खा. डॉ. शिंदे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना यावेळी केले.
महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांनी सांगितले की खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एकही काम बाकी ठेवले नसल्याने समोरच्या उमेदवाराची झोप उडाली आहे. आता सर्वांनी मतदानाला उतरा आणि महायुतीच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन मोरे यांनी केले.
या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश..
दरम्यान या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कल्याण जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे, युवासेना विस्तारक कामेश जाधव, उपजिल्हाप्रमुख पिसवली उमेश निंबाळकर यांच्यासह मनसेचे उपविभाग प्रमुख समीर करंबेळकर, विभाग अध्यक्ष संकेत तांबे, विभाग सचिव शिरीष देसाई, विभाग अध्यक्ष वैभव रत्नपारखी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्वांचे स्वागत करत त्यांना पक्षासाठी झटून काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी खा. डॉ. श्रीकांत शिंदे, भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आर पी आयचे अण्णा रोकडे, रवी पाटील, नंदू परब, लता पाटील, राष्ट्रवादीचे सुरेश जोशी , ठाणे महापालिकेचे उपमहापौर रमाकांत मडवी, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. जयेश महाराज, बाळकृष्ण महाराज यांच्यासह शिवसेना भाजप महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.