
डोंबिवली दि.2 ऑगस्ट :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे समर्थक डोंबिवलीतील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेमध्ये आमने सामने आलेले पाहायला मिळाले. या मध्यवर्ती शाखेतून काही आठवड्यांपूर्वी काढण्यात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे फोटो पुन्हा लावण्यावरून आज दुपारी दोन्ही गटात वाद झाला. परंतू त्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांकडन हे फोटो पुन्हा याठिकाणी लावण्यात आल्याचे दिसून आले.
एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेनंतर डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शाखेतून काही आठवड्यांपूर्वी एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे फोटो उद्धव ठाकरे समर्थकांकडून काढण्यात आले होते. हे फोटो पुन्हा लावण्यासाठी आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक मोठ्या संख्येने डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेमध्ये आले होते. त्यावेळी उध्दव ठाकरे समर्थकही त्याठिकाणी दाखल होत त्यांनी हे फोटो लावण्यासाठी विरोध दर्शवला. त्यावेळी दोन्ही गटांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची, धक्काबुक्की तसेच दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे फोटो यावेळी लावण्यात यश आले.
दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने शिवसेना शाखेत धाव घेतली आणि मध्यस्थी करत हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.