Home ठळक बातम्या “एकनाथ शिंदे एक बार कमिटमेंट करता है तो”… डोंबिवलीतील त्या बॅनरची जोरदार...

“एकनाथ शिंदे एक बार कमिटमेंट करता है तो”… डोंबिवलीतील त्या बॅनरची जोरदार चर्चा

डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्याकडून लावण्यात आलेत बॅनर

डोंबिवली दि.19 ऑगस्ट :
कल्याण पूर्वेतील राजकीय बॅनरची चर्चा थांबते न थांबते तोच आता डोंबिवली परिसरात लागलेल्या राजकीय बॅनरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्याकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत.

सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील महिला वर्गात आनंदाचे वातावरण दिसत आहे. या योजनेसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 27 गावांतील मालमत्ता कर, पाणी प्रश्न, जिल्हा परिषदेच्या शाळांचा प्रश्न असो की इथल्या केडीएमसीच्या कामगारांचा प्रश्न. हे सर्व महत्त्वाचे प्रश्न कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कायमस्वरूपी सोडवून घेतले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे अभिनंदनपर बॅनर शहरप्रमुख राजेश मोरे यांनी डोंबिवलीत ठिकठिकाणी लावले आहेत. ज्यामध्ये “एकनाथ शिंदे एक बार कमिटमेंट करता है तो अपने आप की भी नही सूनता” अशा अनोख्या फिल्मी डायलॉगच्या शब्दांत मोरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या धडाकेबाज आणि वेगवान कामाचे कौतुक केले आहे. तर “जनसामान्यांच्या मनातील ध्रुवतारा” अशा आशयाचे बॅनर लावत राजेश मोरे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

याबाबत शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले की सिनेमा वेगळा असतो आणि प्रत्यक्ष काम करणे वेगळे असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या कामातून हेच दाखवून दिले आहे की आम्ही एकदा शब्द दिला की तो पूर्ण करतोच करतो. मग ती लाडकी बहीण योजना असो की 27 गावांतील कर, पाणी यासारखे महत्त्वाचे प्रश्न. याबाबत त्यांनी शब्दही दिला आणि तो पूर्णही केला आहे. त्यामुळे आपण या आशयाचे बॅनर लावले असल्याची प्रतिक्रिया राजेश मोरे यांनी दिली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा