अनुभूती बाल वाचक कट्ट्याचा स्तुत्य उपक्रम
कल्याण दि.६ जुलै :
‘वाचाल तर वाचाल’ असं आपण नुसतं म्हणतो पण सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात पुस्तक आणि तेही मराठी पुस्तक वाचन कुठे तरी दूर राहीलंय. हीच नेमकी बाब हेरून कल्याणमध्ये प्रथमच अनुभूती बाल वाचक कट्ट्यातर्फे मराठी बालवाचन स्पर्धा पार पडली.
कल्याण पश्चिमेच्या गजानन विद्यामंदिरमध्ये मराठी पुस्तक वाचन आणि मराठी कविता वाचन या दोन गटात ही स्पर्धा भरघोस प्रतिसादात पार पडली. कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा परिसराच्या वेगवेगळ्या शाळांतील ८० स्पर्धक सहभागी झाले होते. गजानन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कांचन भालेराव, परीक्षक प्रवीण देशमुख आणि सुप्रसिद्ध नाट्य अभिनेते अभिजित झुंझारराव आदींच्या प्रमूख उपस्थितीत या स्पर्धेला सुरवात झाली.
या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक पालकांनी मराठी पुस्तक वाचन संदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या. साधारणपणे ४ तास चाललेल्या या स्पर्धेत पुस्तक वाचक गटामध्ये वांशिका घोंगरे – प्रथम, आर्या हिवाळे द्वितीय तर समृद्धी शेट्टीने तृतीय क्रमांक आणि सुयश टेंभे, निमिषा मोराणकर यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला. तर कविता वाचन स्पर्धेत आर्या शिंपी – प्रथम, स्पृहा मोराणकर – द्वितीय तर श्रेया जोशी – तृतीय आणि जुईली मलबारी, आरोही शेंबडे यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला. आणि या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.
मुलांची वाचनाशी नाळ जोडली जावी, वाचन संस्कार रुजावा, वाचनाची गोडी निर्माण होण्याच्या दिशेने बालवाचक कट्टा असेच वेगवेगळे उपक्रम राबवणार असल्याची माहिती संस्थेच्या शुभांगी ओतूरकर यांनी दिली.
ह्या नीट नेटक्या आयोजनात प्रसाद सोमण, मृणालिनी जोशी आणि प्रणिता चितापूरकर यांनी घेतलेल्या परिश्रमा मुळेच ही स्पर्धा यशस्वी पार पडली.