Home ठळक बातम्या दुर्गाडी किल्ला : शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून कल्याणात घंटानाद आंदोलन

दुर्गाडी किल्ला : शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून कल्याणात घंटानाद आंदोलन

कल्याण दि.17 जून :
बकरी ईदच्या दिवशी काही काळ हिंदू बांधवाना दुर्गाडी येथील दुर्गामाता मंदिरात प्रवेश बंदी घालण्यात येते. याचा विरोध म्हणून शिवसेनेच्या दोन्ही गटातर्फे कल्याणात घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या निमित्ताने एकेमकांसमोर ठाकलेल्या दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी 38 वर्षांपूर्वी म्हणजेच 1986 च्या दशकात या घंटानाद आंदोलनाला प्रारंभ झाला. तेव्हापासून आजतागायत दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी शिवसेनेकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी कल्याणच्या लोकमान्य टिळक चौक येथून सर्व शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ल्याच्या दिशेने कूच केले. मात्र पोलीस प्रशासनाने या दोन्ही गटांना लालचौकी परिसरातच बॅरीकेट लावून रोखून धरले. ज्याठिकाणी काही काळ पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही काळ धक्काबुक्कीही झाली. तर शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजीही केली जात होती.

जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार – गोपाळ लांडगे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या पुढाकाराने सुरू झालेले हे आंदोलन त्यांच्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी 20 वर्षे कायम ठेवले आहे. त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

हे डुप्लीकेट हिंदुत्ववादी सरकार – विजय साळवी
सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेली अनेक वर्षे या घंटानाद आंदोलनाचे नेतृत्व केले. आणि आज त्यांचे सरकार असताना ते मुख्यमंत्री असताना त्यांचेच प्रशासनाचे अधिकारी आज किल्ल्यावर बंदीचा आदेश काढत आहेत. यावरून हे डुप्लीकेट हिंदुत्ववादी सरकार असून आम्ही त्याचा निषेध करत असल्याची प्रतिक्रिया उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विजय साळवी यांनी दिली आहे.

दरम्यान एकीकडे हे घंटानाद आंदोलन सुरू असताना दुसरीकडे मुस्लिम बांधवांनी दुर्गाडी किल्ला परिसरात शांततेत बकरी ईदची नमाज अदा करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा