डोंबिवली दि.16 जून :
कल्याण डोंबिवली महापालिकेने रिंगरोड आणि इतर प्रकल्पांसाठी डम्पिंग ग्राऊंड बंद केल्याचा गंभीर आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. तसेच डम्पिंग ग्राऊंड बंद केल्याबाबत केडीएमसीचे अभिनंदन असून त्यामागील भावना किती शुद्ध आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
डम्पिंगबाबतचे केडीएमसीचे धोरण म्हणजे एकीकडे खड्डा करणे आणि दुसरीकडे भरणी काहीसे असेच आहे. बारावे येथील प्रकल्पाचाही स्थानिकांना त्रास होत असून पालिकेने कुठे तरी एक सुनियोजित प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करणे आवश्यक असल्याचेही आमदार राजू पाटील यांनी सांगितले.
तर कोपर पुलाच्या कामाऐवजी त्याच्या तारखांचीच गती अधिक असल्याचा टोमणाही त्यांनी यावेळी पालिकेला लगावला. कोपर पुलाच्या केवळ तारखा पडत आहेत. यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नसून तो पूल जेव्हा व्हायचा तेव्हाच होईल. कोपर पुलाचे पायाभूत काम संथगतीने सुरू असून अद्याप याठिकाणी असणाऱ्या वीज वाहिन्या आणि ट्रान्सफॉर्मर अद्याप शिफ्ट झाल्या नसल्याचेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन कल्याण ग्रामीणमधील लसीकरण, 27 गावांतील कर्मचारी, डम्पिंग आदी विषयांवर चर्चा केली. यावेळी प्रकाश भोईर, प्रकाश माने, मनोज घरत, मंदा पाटील, कोमल पाटील, राहुल कामत, सुदेश चुडनाईक, मिलिंद म्हात्रे, हर्षद पाटील, संदीप म्हात्रे, स्मिता भणगे आदी पदाधिकारी आणि मनसैनिक उपस्थित होते.