डॉ.विजय सूर्यवंशी, डॉ. इंदुराणी जाखड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
कल्याण दि.1 डिसेंबर :
महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट संघटनेच्या कल्याणात झालेल्या शानदार सोहळ्यात डॉ. प्रशांत पाटील यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारली. गुरुदेव ग्रँड हॉटेलच्या सभागृहात राज्य उत्पादन शुल्क खात्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, केडीएमसी आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रेडिओलॉजीस्ट संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण कार्यक्रम संपन्न झाला. विशेष म्हणजे यावेळी कल्याणातील ब्रह्मवृंदांनी वैदिक मंत्रोच्चाराच्या जयघोषात डॉ. पाटील यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. (Dr. Prashant Patil accepted the charge as President of Maharashtra Radiologists Association)
काही महिन्यांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट संघटनेच्या निवडणूकीत कल्याण आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांच्यासह इतर सहकाऱ्यांचा दणदणीत विजय झाला होता. या निवडणूकीत डॉ. प्रशांत पाटील हे अध्यक्षपदी निवडून आले असून रेडिओलॉजिस्ट संघटनेच्या कल्याणात झालेल्या तीन दिवसीय परिषदेच्या पदग्रहण कार्यक्रमात डॉ. पाटील यांच्यासह डॉ.सुशांत भदाणे यांनी सचिव तर डॉ.संदीप महाजन यांनी खजिनदार पदांचा पदभार यावेळी स्विकारला.
या पदग्रहण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत असलेले राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी कोविड काळात कल्याणच्या डॉक्टर आर्मीने केलेल्या कामगिरीचा विशेष उल्लेख करीत डॉक्टर आर्मीच्या सदस्य डॉक्टरांचे पुनश्च आभार मानले. तर डॉ. प्रशांत पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्यातील उत्साहाचा झरा आणि सतत काही तरी नविन करण्याचा ध्यास हा या गुणांचा महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट संघटनेला नक्कीच फायदा होईल अशी भावना व्यक्त केली. तर सर्वांना एकत्रित घेऊन पुढे जाण्याच्या नेतृत्व कौशल्याच्या बळावर डॉ. प्रशांत पाटील हे या महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट संघटनेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील असा विश्वास केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी व्यक्त केला.
दरम्यान या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट तज्ञांचा उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला डॉ.आरती विजय सूर्यवंशी, डिसीपी अतुल झेंडे, डीसीपी सचिन गुंजाळ, तहसीलदार सचिन शेजाळ, कल्याण आयएमएच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा ईटकर, रेडिओलॉजिस्ट संघटनेचे डॉ.संदीप कवठले, डॉ. प्रदीप गांधी, डॉ. संदीप महाजन, डॉ.प्रविण सांगोळे, डॉ. समीर गांधी, केडीएमसीचे उपायुक्त संजय जाधव, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. तर कल्याणात प्रथमच झालेल्या या तीन दिवसीय परिषदेमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्याही सहभागी झाल्या होत्या.