
जायंटसचे अध्यक्षपद आणि पीएचडी मिळवल्याबद्दल डॉ.किशोर देसाई यांचा दिमाखदार सोहळ्यात गौरव
कल्याण दि.16 फेब्रुवारी :
डॉ. किशोर देसाई यांनी संशोधन क्षेत्रात केलेलं काम अत्यंत दर्जेदार असून ते अजिबात थांबता कामा नये, ते अशाच पद्धतीने पेटंटपर्यंत पुढे घेऊन जाण्याची अपेक्षा मुंबई विद्यापीठाचे माजी प्र उपकुलगुरू आणि बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेशचंद्र यांनी व्यक्त केली. (Dr. Kishore Desai’s work in the field of research should continue like this – Former Vice-Chancellor Dr. Nareshchandra)
जायंटस वेलफेअर फाऊंडेशन फेड 1सी च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल आणि बायोटेक्नॉलॉजी विषयात पीएचडी प्राप्त केल्याबद्दल प्रा. किशोर देसाई यांचा डॉ. नरेशचंद्र आणि केडीएमसी उपायुक्त संजय जाधव यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात सन्मान करण्यात आला. कल्याणच्या सुप्रसिद्ध के.सी.गांधी शाळेच्या सुसज्ज ऑडिटोरियममध्ये झालेल्या या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. नरेशचंद्र यांनी ही अपेक्षा व्यक्त केली.
किशोर देसाई यांनी गेल्या 3 दशकांपासून आपला हा सामाजिक कार्याचा वसा अव्याहतपणे सुरू ठेवला आहे. या समाजाने आपल्याला नेहमीच दिले असून आपणही या समाजाचे देणं लागत असल्याची भावना किशोर देसाई यांच्यामध्ये दिसून येते. एखाद्याला शिक्षणाची इतकी आस असते की तो आयुष्यभर शिकतच राहतो. आणि याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच प्रा.किशोर देसाई असल्याचे गौरवोद्गार केडीएमसीचे उपायुक्त संजय जाधव यांनी यावेळी काढले. तसेच आपल्या आईच्या उपस्थितीत किशोर देसाई यांचा झालेला हा सन्मान त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान असल्याची भावनाही संजय जाधव यांनी यावेळी व्यक्त केली.
तर सत्कार समारंभाला उत्तर देताना डॉ. किशोर देसाई यांनी सांगितले की आई ही आपली सर्वात पहिली गुरू असते, त्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये बिर्ला कॉलेजमध्ये शिकताना डॉ. नरेशचंद्र सरांचे आणि सामाजिक क्षेत्रात मनोहर पालन सर या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. या तिन्ही गुरूंनी आपल्याला दाखवलेला मार्ग, दिलेले संस्कार त्या सर्वाचे हे फलित असल्याची कृतज्ञता डॉ. किशोर देसाई यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी जायंटस वेलफेअर फाऊंडेशनचे जागतिक उपाध्यक्ष ॲड. पी.सी. जोशी, सेंट्रल कमिटी मेंबर मनोहर पालन, गगन जैन, संजय गुप्ता, उर्वशी गुप्ता यांच्यासह महाराष्ट्र रेडिओलॉजी संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.