कल्याण लोकसभेतील प्रमूख पदाधिकाऱ्यांच्या बैठका
कल्याण डोंबिवली दि.2 एप्रिल :
अद्याप आपल्याविरोधात कोणताही उमेदवार देण्यात आला नसला तरी आगामी लोकसभा निवडणूक ही निवडणुकीच्या पध्दतीनेच आम्ही लढणार आहोत. मात्र पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फाजील आत्मविश्वास न बाळगता कामाला लागण्याचे आवाहन कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काल डोंबिवलीमध्ये 144 कल्याण ग्रामीण आणि 143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील प्रमूख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे आवाहन केले. (Don’t have too much confidence for the upcoming elections – MP Dr. Shinde’s appeal to office bearers)
लोकसभा निवडणुकीचे मतदान होण्यासाठी 50 दिवस शिल्लक आहेत. ठाणे जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात म्हणजेच 20 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा मतदान करणारे युवा मतदार असोत की 85 वर्षांवरील ज्येष्ठ मतदार असो यांच्यापर्यंत कसे पोहोचायचे, निवडणुक प्रचाराचे नियोजन कसे करायचे आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर उपस्थित पदाधिकारी आणि नगरसेवकांना या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. तर पुढील आठवड्यात शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, विभागप्रमुख, गटप्रमूख आणि शिवदूत यांच्या पॅनलनुसार बैठका आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिली.
गेली दहा वर्षे खासदार म्हणून काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न…
आपण गेली दहा वर्षे लोकांच्या विश्वासावर आणि सहकार्याने या मतदारसंघाचा खासदार म्हणून काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यातूनच मतदारसंघात आज मोठी विकासकामे उभी राहिली असून ही कामे लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत. विरोधकांना आज न उद्या कोणी ना कोणीतरी उमेदवार द्यावा लागेल, मात्र आपल्याविरोधात कोण उमेदवार येईल याऐवजी आपण केलेली कामे लोकांपर्यंत कशी पोहोचतील यादृष्टीने आम्ही विचार करत असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. उमेदवार कोणी आला तरी निवडणुकीच्या पद्धतीने आम्ही ही निवडणूक लढणार आहोत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारे फाजील आत्मविश्वास येता कामा नये. त्याऐवजी 2019 मध्ये ज्या मताधिक्याने आपण निवडून आलो त्यापेक्षा अधिक मतांनी यंदा कसे निवडून येऊ यासाठी आम्ही सर्व जण प्रयत्न करत असल्याचेही खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.
या बैठकीला जिल्हाप्रमूख गोपाळ लांडगे, उपजिल्हा प्रमुख मल्लेश शेट्टी, माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, रमाकांत मढवी, युवासेना सचिव दिपेश म्हात्रे, महिला आघाडी प्रमुख लता पाटील, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, शहरप्रमूख राजेश मोरे, महेश गायकवाड यांच्यासह अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.