डोंबिवली दि.28 मार्च :
गुढीपाडव्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात नववर्ष स्वागतयात्रेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या डोंबिवली श्री गणेश संस्थानची नववर्ष स्वागतयात्रा यंदा साधेपणाने करण्याचा निर्णय आला आहे. तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्कार भारतीतर्फे काढण्यात येणाऱ्या 75 रांगोळ्या या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहेत.
कोरोनामुळे 2020 आणि 2021 अशी सलग 2 वर्षे या स्वागतयात्रेला ब्रेक लागला होता. यंदा मात्र कोवीडची परिस्थिती बऱ्यापैकी निवळली असली तरी निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर ही स्वागतयात्रा साधेपणाने करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष राहुल दामले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तर यंदा कोणत्याही प्रकारचे देखावे असणारे रथ या नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होणार नसून साधेपणाने श्री गणेशाच्या पालखीच्या माध्यमातून काढली जाणार आहे. भागशाळा मैदानाऐवजी डोंबिवली पश्चिमेच्या पंडित दिनदयाळ मार्गावरील मारुती मंदिरापासून ही पालखी निघणार आहे.
तर यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजेच 75 वे वर्ष असून त्याचे औचित्य साधून संस्कार भारतीतर्फे 75 कलाकार वेगवेगळ्या ठिकाणी अत्यंत सुबक अशा 75 रांगोळ्या काढणार असल्याची माहिती उमेश पांचाळ यांनी यावेळी दिली.
तर गुढी पाडव्याच्या निमित्ताने दिपोत्सव, कोवीड काळात प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार यांसह विविध धार्मिक कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राहुल दामले यांनी दिली.या पत्रकार परिषदेला गणेश मंदिर संस्थानचे मंदार हळबे, अलका मुतालिक, शिरीष आपटे, प्रविण दुधे आदी पदाधिकारीही उपस्थित होते.