डोंबिवली, दि. १९ मार्च :
नववर्ष शोभायात्रेच्या निमित्ताने यंदा डोंबिवलीत पहिल्यांदाच सांस्कृतिक पथाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला डोंबिवलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, आबालवृद्धांनी सांस्कृतिक पथावर मनसोक्त जल्लोष केला.
पंचमहाभूतांच्या दिंडीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश…
सकाळी श्री गणेश मंदिरातून पंचमहाभूतांच्या दिंडीची पूजा करून सांस्कृतिक पथाच्या कार्यक्रमाला सुरूवात झाली. अग्नि, जल, पृथ्वी, वायू आणि आकाश या पाच तत्वांभोवतीच आपलं राहणीमान विसंबून आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हेच पाच घटक अत्यंत महत्वाचे आहेत, तर पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देणार नाही, अशी जनजागृती करत या पंचमहाभूतांच्या दिंडीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. या दिंडीत सहभागी अनेक सदस्यांनी हातात वनौषधींची कुंडा घेतली होती. त्यातून उपस्थितांना त्यांनी आपल्याच देशातील वनौषधींचं संवर्धन आणि जतन सगळ्यांनी केलं पाहिजे असा संदेश दिला.
घरातील पारंपारिक वस्तूंचं प्रदर्शनही…
या सांस्कृतिक पथावर आपल्या स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक वस्तूंचं प्रदर्शनही केलं होतं. त्यात जातं, पाटा वरवंटा, उखळ आणि मुसळ, याठिकाणी महिलांनी या वस्तू हाताळत त्याचा चांगलाच आनंद घेतला. शिवाय वारली पेंटिंग, जागोजागी परंपरेतल्या रूढी दर्शवणारे स्टाॅल्स आणि त्यावर आधारित सेल्फी पाॅंईंट उभे करण्यात आले होते.
विविध सामाजिक संस्थांचा सहभाग…
ढोलताशा, झांजपथक, संबळ गोंधळी, पारंपारिक वेशात कोळी, जोगवा, गोंधळ, लावणी, वाघ्या-मुरळी यांच्या परंपरेवर आधारित गाण्यांवर विविध नृत्य संस्थेच्या मुलींनी नृत्य सादर केली. त्याला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला. पर्यावरण दक्षता मंडळ, ऊर्जा फाऊंडेशन, श्री लक्ष्मी नारायण संस्था, विवेकानंद मंडळ यांनी एकत्रितपणे पंचमहाभूतांची दिंडी काढली होती.