डोंबिवली दि.1 ऑगस्ट :
डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखेने चिपळूण परिसरातील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील आणि कल्याण-डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तूंचा टेम्पो रविवारी कोकणाकडे रवाना करण्यात आला.
अतिवृष्टी झाल्याने अचानक उद्भवलेल्या पुर परिस्थितीमुळे चिपळूण भागातील अनेक गावांवर मोठे संकट ओढावले आहे. पावसामुळे डोंगर-कडे कोसळून गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या गावकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेऊन डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण उपशाखचे पोनि उमेश गित्ते, सपोनि राजश्री शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वच्छेने केलेली मदत, तसेच साईश ग्रुपच्या राजश्री पवार यांच्या संयुक्त विद्यामाने बाधित कुटुंबियांच्या मुलभूत गरजा भागवण्यासाठी पुरग्रस्त भागातील ग्रामस्थांना गहू, तांदूळ, डाळ, तेल, कपडे भरलेला एक टेम्पो ठाण्यातील तीन हात नाक्यावरून पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केला.