Home ठळक बातम्या डोंबिवलीत भरलंय गड – किल्ल्याचं अप्रतिम प्रदर्शन

डोंबिवलीत भरलंय गड – किल्ल्याचं अप्रतिम प्रदर्शन

मनसे प्रभाग क्रमांक 28 आणि जाणता राजा युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

डोंबिवली दि.23 ऑक्टोबर :
छत्रपती शिवाजी महाराज. उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. स्वराज्याच्या निर्मितीसाठी महाराजांच्या पाठीशी शुर मावळ्यांच्या साथीने कोणी उभं ठाकले असेल तर तो सह्याद्री. सह्याद्रीच्या साथीने महाराजांनी स्वराज्य केवळ स्थापन केले नाही तर अनेक आक्रमणांपासून संरक्षणही केले. आपल्या या सोनेरी इतिहासाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचिण्यासाठी डोंबिवली पश्चिमेला या गड किल्ल्यांचे अप्रतिम असे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. मनसे प्रभाग क्रमांक 28 आणि जाणता राजा युवा प्रतिष्ठानतर्फे हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते या गड किल्ले स्पर्धा आणि प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

डोंबिवली पश्चिमेच्या गावदेवी मैदानात भरलेल्या या प्रदर्शनात तब्बल 15 महत्वाच्या गड किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे डोंबिवली शहराच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी अत्यंत मेहनतीने सुंदर असे गड किल्ल्यांची प्रतिकृती साकारली आहे. डोंबिवलीच्या जोंधळे हायस्कूल, श्री वेलंकन्नी इंग्लिश स्कूल, मंजुनाथ, नेरूरकर, गावदेवी माध्यमिक विद्यालय, स. वा. जोशी, टिळक नगर, सेंट झेवियर्स इंग्लिश स्कूल, सरस्वती विद्यामंदिर, तोंडवळकर विद्यालय, राधाबाई साठे या शाळांचा सहभाग आहे. ज्यामध्ये लोहगड, वासोटा, पन्हाळा, सिंहगड – कोंढाणा, हडसर, पुरंदर, प्रतापगड, राजगड, तोरणा, विसापूर, रायगड, विशाळगड, कोरीगड, शिवनेरी, सज्जनगड आदी किल्ल्यांचा समावेश आहे.

आपल्या शालेय शिक्षणातून पुसून टाकण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गड किल्ल्यांचा इतिहास आपल्या नव्या पिढीपर्यंत जाणे आवश्यक आहे. गड किल्ल्यांची अशी प्रदर्शने त्यात नक्कीच महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास मनसे आमदार राजू पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
या उद्घाटन सोहळ्याला मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, विधानसभा अध्यक्ष विनोद पाटील, माजी नगरसेविका सरोज भोईर यांच्यासह मनसेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा