डोंबिवली दि.16 डिसेंबर :
गेल्या 25 वर्षांपासून डोंबिवलीकरांच्या मनामध्ये वेगळे स्थान निर्माण केलेल्या उत्सव -2023 साठी डोंबिवली जिमखाना सज्ज झाला आहे. तर याठिकाणी साकारण्यात येणारी श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती यंदाच्या उत्सव सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरणार आहे. येत्या 23 ते 31 डिसेंबर दरम्यान नेहमीप्रमाणेच डोंबिवली जिमखान्याच्या मैदानावर हा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली.
‘सर्वांसाठी सर्व काही’ हे ब्रिदवाक्य सार्थक ठरवत गेल्या 25 वर्षांपासून डोंबिवली जिमखान्यातर्फे उत्सवचे आयोजन करण्यात येत आहे. गेल्यावर्षी उत्सवचा रौप्य महोत्सवी सोहळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र यंदा जिमखाना आणि उत्सवचे खजिनदार हरहन्नरी व्यक्तिमत्त्व मधुकर चक्रदेव यांच्या आकस्मिक निधनामुळे दुखाची किनार या उत्सवावर असली तरीही शो मस्ट गो ऑन’ या उक्तीप्रमाणे यंदाचा उत्सव साजरा करण्याचा निर्णय कमिटीच्या वतीने घेण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
वेगवेगळ्या उत्पादकांनी आपल्या उत्पादनासाठी योग्य आणि साजेशी बाजारपेठ म्हणून उत्सवला कायमच वरचे स्थान दिले असून यंदाही उत्सवमध्ये १४० स्टॉलचे बुकिंग झाले आहे. खरेदीबरोबरच अम्यूझमेट पार्क, फूड स्टॉलचा आनंदही डोंबिवलीकरांना घेता येणार आहे. यंदाचे एक वेगळे आकर्षण म्हणजे ‘श्रीराम मंदिराची प्रतिकृती’ याठिकाणी साकरण्यात येणार आहे. ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’ ह्यांच्या माध्यमातून ही प्रतिकृती साकारण्यात येत आहे.
डोंबिवलीतील नागरिकांसाठी डोंबिवली जिमखान्यातर्फे १९९६ मध्ये या उत्सवची करण्यात आली. सुईपासून ते घरगुती वापराच्या सर्व वस्तू आणि सौंदर्य प्रसाधनापासून कपडे – दागिन्यापर्यंत सर्व वस्तू उत्सवच्या एकाच छताखाली डोंबिवलीकर ही पर्वणी अनुभवत आहेत. विशेष म्हणजे या महोत्सवात मिळणाऱ्या अनेक वस्तू केवळ याच ठिकाणी मिळतात. २०२० साली करोनामुळे उत्सव सलग दोन वर्षे रद्द करावा लागला. मात्र त्यानंतर मागील वर्षी २०२२ मध्ये त्यापेक्षा कितीतरी उत्साहाने उत्सवचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
उत्सवच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न हे जिमखान्यातील मैदानाच्या देखभाल दुरुस्तीसह विविध खेळाची मैदाने तयार करण्यासाठी खर्च केले जाते. मात्र त्याचबरोबर सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेऊन जिमखान्याने करोना काळात तब्बल दीड वर्ष जिमखान्याच्या मैदानाचा मोठा भाग करोना रुग्णालय उभारण्यासाठी कोणताही मोबदला न घेता पालिका प्रशासनाला उपलब्ध करून दिल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
उत्सवच्या या व्यासपीठावरून डोंबिवलीतील विविध सांस्कृतिक संस्था, शाळाचे विद्यार्थी विविध कलागुण सादर करण्यासह झी टीव्हीचे लाडके कलाकारही उत्सवच्या कालावधीत प्रेक्षकांच्या, रसिकांच्या भेटीला येणार आहेत. सांस्कृतिक परपरेबरोबरच सामाजिक भान जपताना पोलिसांच्या माध्यमातून सायबर गुन्हे रोखण्याबाबत जनजागृतीपर पथनाट्य या व्यासपीठावरून सादर केले जाणार आहे. तसेच डोंबिवली आणि परिसरातील १ लाख शालेय विद्यार्थ्यांना उत्सवचे मोफत पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
डॉक्टर श्रीकांत शिंदे फाऊडेशनने उत्सवचे मुख्य प्रायोजकत्व स्विकारले असून सालाबादप्रमाणे ‘डोंबिवलीकर एक सास्कृतिक परिवार’ गेली १३ वर्षे उत्सवाचे प्रायोजक आहेत. देशभरात नावाजलेल्या पितांबरीने दरवर्षी प्रमाणे यंदाही उत्सवला सहप्रयोजकत्व दिल्याची माहिती यावेळी आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला उपध्यक्ष,डॉ. प्रमोद बाहेकर, सचिव पर्णाद मोकाशी, आनंद डीचोलकर, सहसचिव रामदास पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.