कल्याण/ डोंबिवली दि.6 मार्च :
डोंबिवली, ठाकुर्लीसह कल्याणकरांसाठी कालची रात्र चांगलीच तापदायक ठरलेली पाहायला मिळाली. अचानकपणे येऊ लागलेल्या ‘उग्र वासा’ने नागरिक हैराण झाले होते. हा उग्र वास नेमका कुठून आणि कसा येतोय याची अद्याप माहिती मिळू न शकल्याने या उग्र वासाचे गूढ वाढलं आहे.
रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सुरुवातीला डोंबिवली, ठाकुर्ली आणि नंतर कल्याणातही अचानक उग्र वास येण्यास सुरुवात झाली. ज्यामुळे नागरिकांना विशेषतः वयस्कर नागरिकांना श्वास घेण्यास काहीसा त्रास होऊ लागला. त्यासोबत डोळ्यांचीही जळजळ सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणही पसरले होते. काही महिन्यांपूर्वीही अशाच प्रकारच्या उग्र दर्पाने नागरिकांना त्रास झाला होता. मात्र कालच्या प्रमाणे त्या वासामागचेही नेमके कारण समोर आले नव्हते.
डोंबिवली एमआयडीसीमध्ये असणाऱ्या केमिकल कंपन्या आणि त्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा डोंबिवलीकरांसाठी काही नविन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न भिजत घोंगड्याप्रमाणे प्रलंबित आहे. त्यामूळे काल रात्री आलेल्या उग्र वासाशीही हेच कारण असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे याबाबत वारंवार तक्रारी आणि अर्ज करूनही शासकीय यंत्रणा त्याकडे फारसे गांभिर्याने पाहताना दिसत नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
लोढा पलावापासून कल्याणपर्यंत हा उग्र दर्प आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र आपण यातील बहुतांश ठिकाणी फिरलो तरी आपल्याला मात्र असा उग्र दर्प आल्याचे जाणवले नाही. केमिकल कंपनीमुळे हा उग्र दर्प पसरला असता तर एवढ्या मोठ्या परिसरात त्याचा परिणाम न होता ठराविक क्षेत्रापुरता त्याचा दर्प मर्यादित राहिला असता. – देवेन सोनी, कामा संघटना अध्यक्ष