
कल्याण दि. २७ फेब्रुवारी :
ऐरव्ही रुग्ण तपासण्यात आणि शस्त्रक्रिया करण्यात गुंग असणारी कल्याणातील डॉक्टर मंडळी गेले दोन दिवस विविध स्पर्धांमध्ये दंग झाली होती. इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणतर्फे आयएमए खेलो या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
वाढत्या कामाचा ताण हलका होण्यासह नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी आयएमए खेलो हा क्रिडा महोत्सव भरवण्यात येत आहे. अर्जुन पुरस्कार विजेते आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचे प्रशिक्षक दिनेश लाड यांच्या प्रमूख उपस्थितीत या महोत्सवाचा शानदार शुभारंभ करण्यात आला. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात बॅडमिंटन, कॅरम, टेबल टेनिस, बुद्धीबळ आणि क्रिकेट खेळाचा समावेश होता. आयएमएतील तब्बल २०० डॉक्टर सहभागी झाले होते. ज्यामध्ये विशेष म्हणजे महिला डॉक्टरांची संख्या लक्षणीय होती अशी माहिती आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली.
आयएमए च्या उपक्रमांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – डी सी पी सचिन गुंजाळ…
अंतिम सामन्यापर्यंत रंगलेल्या या क्रीडा महोत्सवाचा समारोप आणि बक्षिस वितरण समारंभ कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या प्रमूख उपस्थितीत करण्यात आला. कल्याणमध्ये आयएमएमार्फत होणाऱ्या विविध उपक्रमांना मिळणारा लोकांचा सहभाग आणि भरघोस प्रतिसाद हा इतर कोणत्याही संस्थेला मिळत नसल्याची कौतुकाची थाप डीसीपी सचिन गुंजाळ यांनी यावेळी दिली. तसेच स्वतःचे आरोग्य चांगले असेल तरच आपण समाजाच्या आरोग्याची चांगली काळजी घेऊ शकतो हे आयएमएने या क्रिडा महोत्सवाद्वारे दाखवून दिल्याचेही डीसीपी गुंजाळ म्हणाले.
कल्याणातील क्रिकेट प्रशिक्षक संतोष पाठक यांच्या स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर झालेला हा क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी आयएमए कल्याणचे डॉ. ईशा पानसरे, डॉ. राजेश राजू, डॉ. संदेश रोठे, डॉ. हिमांशु ठक्कर, डॉ. प्रशांत खटाळे, डॉ. प्रदीप शेलार, डॉ. स्वाती शेलार यांच्यासह अनेक डॉक्टरांचा सिंहाचा वाटा होता.