कल्याण दि.17 सप्टेंबर :
अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम केडीएमसीकडून दिवसागणिक तीव्र करण्यात आली असून अनधिकृत बांधकामांना वीज जोडणी न देण्याचे आवाहन केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महावितरणला केले आहे. अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा मंजूर करणे म्हणजे शहराच्या सुनियोजित विकासाला बाधक कृत्य असल्याचे सांगत अशा बांधकामाना वीजपुरवठा मंजूर न करण्याच्या सूचना महावितरणने सर्व कार्यालयांना देण्याचे आवाहनही डॉ. सूर्यवंशी यांनी केले आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रांत नविन गृहसंकुले / इमारती उभारण्याची कामे प्रगतपीथावर सुरू आहेत. यासंदर्भात महानगरपालिकेच्या नगररचना विभागाची अधिकृत परवानगी प्राप्त झाल्यानंतरच प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करणे अपेक्षित आहे.
मात्र काही काही विकासक आणि अनधिकृत बांधकाम करणा-या व्यक्ती महानगरपालिकेच्या नगररचना विभागाची अधिकृत परवानगी प्राप्त करुन न घेताच बहुमजली गृहसंकुले इमारती उभारणीची कामे करत आहेत. काही अनधिकृत बांधकामे तर शासकीय, महानगरपालिकेच्या आणि आरक्षित भूखंडावर केली जात आहेत. अशा अनधिकृत गृहसंकुले-इमारती महानगरपालिकेतर्फे पाडण्याची कायदेशीर कारवाई झाल्याने नागरीकांची फसवणूक आणि मोठे आर्थिक नुकसानही झाल्याचे निदर्शनास येत असल्याचे आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.
अनधिकृत बांधकामांना विद्युत पुरवठा मंजूर करणे म्हणजे शहराच्या सुनियोजीत विकासाला बाधक कृत्य ठरु शकते. अनधिकृत इमारतींमध्ये दुर्दैवाने अपघात झाल्यास त्याची जबाबदारी आपल्या विभागावर येऊ शकते असे सांगत नगररचना विभागाची परवानगी असल्याची खात्री करूनच महावितरणने वीज जोडणी देण्याचे आवाहन केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. तर अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा मंजूर न करण्याच्या सूचना महावितरणने आपल्या सर्व कार्यालयांना द्यावी असेही डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.