कल्याण दि.१४ एप्रिल :
देशातील विविध महापुरुषांनी मोठ्या कष्टाने विखुरलेल्या समाजाला स्वातंत्र्याच्या निमित्ताने एकत्र केलं मग ते देशाचे स्वातंत्र्य असो की सामाजिक बंधनांचा या सर्वांनीच आपल्याला नेहमी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यामुळे या महापुरुषांना आपण जाती धर्मात विभागू नये अशी भावना इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील यांनी व्यक्त केली.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त जयंतीचे औचित्य साधून कल्याण स्टेशन परिसरात असणाऱ्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला डॉक्टर पाटील यांनी शेकडो आंबेडकरी अनुयायांच्या उपस्थितीत अभिवादन केले.
देशाचे स्वातंत्र्य असो की समाजातील अनेक चुकीच्या रूढीपरंपरांमधून समाजाला बाहेर काढण्याचे काम असो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह प्रत्येक महापुरुषाने आपल्याला एकत्र आणण्याचेच काम केले. परंतु आज दुर्दैवाने आपल्याला या सामाजिक एकीचा विसर पडला असून आपण या महापुरुषांना जाती धर्मात विभागण्यास सुरुवात केली आहे. परंतु ही विभागणी अत्यंत चुकीची असून आपल्याला पुढे जायचे असेल तर एकत्रितपणे आणि जाती-धर्माचे भेद विसरून काम करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे मतही डॉ. पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी त्यांच्यासोबत कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार, माजी नगरसेवक गणेश जाधव, बांधकाम व्यावसायिक अजय सावंत यांच्यासह अनेक अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.