1 ली ते 9 वी आणि 11 वी वर्गाच्या ऑफलाईन शाळा बंद करून ऑनलाईन सुरू ठेवण्याचे आदेश
ठाणे दि.4 जानेवारी :
ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोवीड रुग्णांच्या संख्येत झालेली मोठी वाढ पाहता ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागातील 1ली ते 9 वी आणि 11 वी इयत्ताच्या ऑफलाईन शाळा बंद करून त्या पूर्वीप्रमाणे ऑनलाईन सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.
तर केवळ 10 वी आणि 12 वीचेचे ऑफलाईन वर्ग सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून तो बुधवार 5 जानेवारीपासून ते 31 जानेवारीपर्यंत लागू असणार आहे. तर लसीकरण हेच प्रमुख सुरक्षा कवच असून 15 ते 18 वयोगटातील अधिकाधिक मुलांनी ते करून घेण्याच्या सूचनाही ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या आहेत.
मागील आठवड्यापर्यंत कोरोना रुग्णांची शंभरच्या जवळपास ठाणे जिल्ह्याची आकडेवारी होती. ती आता प्रत्येक दिवशी जवळपास दोन हजार पर्यंत एवढी वाढली आहे. कोरोना संसर्ग हा झपाट्याने सगळीकडे वाढीला लागलेला आहे त्यावर उपाययोजनेसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे. सर्व रुग्णालये, ऑक्सिजनची व्यवस्था, खाटांची उपलब्धता यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय आणि थोडी सावधानता बाळगावी म्हणून उद्यापासून ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील आणि ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावी या सर्व माध्यमांच्या सर्व आस्थापनांच्या ऑफलाइन शाळा बंद असतील. पूर्वीप्रमाणे या वर्गांचे ऑनलाइन शाळा सुरू राहतील. दहावी आणि बारावी यांचे ऑफलाइन वर्ग सुरू राहतील.
जे विद्यार्थी १५ ते १८ वयोगटातील आहेत ते जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपले लसीकरण करून घेऊ शकतात. त्यांनी तातडीने आपले लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.