कल्याण डोंबिवली दि.22 नोव्हेंबर :
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचे मतदान गेल्या बुधवारी सुरळीतपणे पार पडले असून आता निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कल्याण आणि डोंबिवलीतील विधानसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-2024 अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील मतदान पार पडले असून येत्या शनिवार, दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्ह्यातील सर्व 18 मतदारसंघात मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा, पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली. प्रत्येक मतदारसंघातील मतमोजणी केंद्रात सकाळी 08.00 वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. प्रत्येक मतदारसंघात टेबल व फेऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे व उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी दिली. (District administration ready for counting of votes in Kalyan Dombivli, A strong police presence has been deployed to prevent any untoward incident)
138 कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ
138 कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी मुंबई विद्यापीठ उपकेंद्र, वसंत व्हॅली रोड, वृंदावन पॅराडाईज,गंधार नगर, खडकपाडा, कल्याण येथील केंद्रात होणार असून मतमोजणीसाठी 160 व बंदोबस्तासाठी 300 पोलीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मतदारसंघात एकूण 23 फेऱ्या होणार असून ईव्हीएमसाठी 20 व टपाली मतदानासाठी 7 टेबल असणार आहेत.
*139 मुरबाड विधानसभा मतदारसंघ*
139 मुरबाड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती, मुरबाड येथे होणार असून मतमोजणीसाठी 21 टेबल असून एकूण 25 फेऱ्या होणार आहेत. मतमोजणीसाठी 200 अधिकारी, कर्मचारी व 300 पोलीस नियुक्त करण्यात आले आहे.
*140 अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ*
140 अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी महात्मा गांधी विद्यालय, नगरपालिका कार्यालय समोर अंबरनाथ पश्चिम येथे होणार आहे. या मतमोजणीच्या 25 फेऱ्या होणार असून त्यासाठी ईव्हीएमसाठी 14 टेबल्स, टपाली मतपत्रिकेसाठी 6 व व्हीव्हीपॅटसाठी 1 टेबल असणार आहे.
मतमोजणीसाठी 186 अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले असून पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त असणार आहे.
*141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ*
141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, पवई चौक उल्हासनगर-3 येथे होणार आहे. ही मतमोजणी 14 टेबलवर ईव्हीएम आणि 5 टेबलवर पोस्टल असे एकूण 19 टेबलवर संपन्न होणार असून, मतमोजणीच्या जवळपास एकूण 19 फेऱ्या होणार आहेत. या मतमोजणीसाठी शंभरहून अधिक अधिकारी व कर्मचारी तसेच सुरक्षेसाठी पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
*142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात 24 फेऱ्या*
142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी महिला उद्योग केंद्र, रॉयल रेजन्सीच्या पाठीमागे, राजाराम जाधव मार्ग, साईनाथ, विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन समोर, कल्याण पूर्व, ता.कल्याण- 421306 येथील मतमोजणी केंद्रात होणार आहे. यासाठी 150 अधिकारी व कर्मचारी नेण्यात आले असून पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या मतदारसंघात एकूण ईव्हीएमसाठी 14 व टपाली मतदानासाठी दोन टेबल ठेवण्यात आले असून एकूण 24 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.
*143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघ*
143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरेंद्रनाथ बाजपेयी बंदिस्त सभागृह, सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, डोंबिवली पूर्व. येथे होणार आहे. यासाठी 158 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून 300 पोलीसांचा बंदोबस्त असणार आहे. या मतदारसंघात ईव्हीएमसाठी 14 व टपाली मतदानासाठी 2 टेबल असणार असून सुमारे 21 फेऱ्या होणार आहेत.
*144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ*
144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील डोंबिवली पूर्वेतील सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे होणार असून ही मतमोजणी 19 टेबल्सवर संपन्न होणारअसून, मतमोजणीच्या एकूण 31+1 (PB) फेऱ्या होणार आहेत. या मतमोजणीसाठी 150 अधिकारी व कर्मचारी तसेच 150 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.