Home ठळक बातम्या महाविकास आघाडीत बिघाडी : जागावाटपात डावलल्याने कल्याण जिल्हा काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

महाविकास आघाडीत बिघाडी : जागावाटपात डावलल्याने कल्याण जिल्हा काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

अद्याप वेळ गेलेली नाही, पक्षाने जागाबदल कराव्यात

कल्याण दि.27 ऑक्टोबर :
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच जागा वाटपावरून कल्याण जिल्हा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. यंदाच्या निवडणुकीत कोकण आणि ठाणे जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाल्याचे सांगत कल्याण जिल्हा काँग्रेसमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रकट नाराजी दर्शवत 125 जणांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिले आहेत.

पोषक वातावरण असतानाही काँग्रेसला एकही जागा नाही…
गेल्या दशकभरापेक्षा अधिक काळ आम्ही सर्व जण सत्तेच्या विरोधामध्ये प्रामाणिकपणे काम करत आलो आहोत. मग ते पक्ष संघटना वाढीचे काम असो की नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे. आम्ही सर्वांनी प्रामाणिकपणे महाविकास आघाडीचे काम करत महा विकास आघाडीचा धर्म पाळला आहे. मात्र या विधानसभा निवडणुकीत कोकण आणि ठाणे जिल्ह्यात काँग्रेसला पोषक वातावरण असतानाही काँग्रेसला एकही जागा काँग्रेस सोडली नसल्याने आम्ही सर्व जण आमच्या पदांचे सामूहिक राजीनामे देत असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी पत्रकार परिषदेत केल्याने खळबळ उडाली आहे. तसेच अद्याप उमेदवारी भरण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असून पक्षश्रेष्ठींनी कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे घेण्याची आग्रही भूमिका पोटे यांनी यावेळी मांडली.

उमेदवाराचे काम करायचे की नाही याचा निर्णयही लवकरच घेऊ
तर ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी वगळता उर्वरित ठिकाणी काँग्रेसचा पंजा हद्दपार करण्याचे काम या विधानसभा निवडणुकीत झाले आहे. कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला पूरक असतानाही कोणताही विचार न करता इथले चार मतदारसंघ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून परस्पर घोषित करण्यात आल्याचा आरोपही पोटे यांनी यावेळी केला. तसेच विधानसभा निवडणुकीत इथल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराचे काम करायचे की नाही याचा निर्णयही आम्ही लवकरच घेऊ असेही या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.

उमेदवारी अर्ज भरण्यास अद्याप दोन दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी या विषयी गंभीरपणे तोडगा काढावा असे आवाहनही सचिन पोटे यांनी यावेळी केले.

या पत्रकार परिषदेला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, उपाध्यक्ष राजाभाऊ पाटकर, ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर, प्रदेश सदस्य मुन्ना तिवारी, युवक काँग्रेस अध्यक्ष जपजित सिंग, ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांच्यासह काँग्रेस पक्षामधील विविध सेल आणि विभागाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा