कल्याण दि.5 मे :
कल्याण शहरातील काही मुख्य चौकात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सिग्नल यंत्रणा उभी करण्यात आली आहे. मात्र या सिग्नल यंत्रणेमध्ये केवळ इंग्रजी भाषेतून सूचना दिल्या जात होत्या. मात्र त्यावर लवकरच आता मराठी भाषेतूनही सूचना दिसू लागणार आहेत. कल्याणातील संतोष आणि संदीप सहस्त्रबुद्धे या दोघा भावंडांनी याबाबत केलेल्या पाठपुराव्याचे हे यश आहे. (,directions-in-marathi-language-will-now-appear-on-the-signal-system-in-cities)
गेल्या वर्षीपासून कल्याण आणि डोंबिवलीमध्ये असणाऱ्या प्रमूख चौकात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत केडीएमसीकडून सिग्नल यंत्रणा उभारली जात आहे. मात्र त्यावर दाखवल्या जाणाऱ्या इंग्रजी भाषेतील सूचनांवर कल्याणातील सहस्त्रबुद्धे बंधूंनी हरकत घेत स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनकडे त्याबाबत पाठपुरावा केला. सिग्नल यंत्रणांवर स्थानिक भाषेतून सूचना देणे अनिवार्य असल्याबाबतच्या सरकारी नियमांची त्यांनी केडीएमसी स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनला आठवण करून दिली. आणि स्मार्ट सिटी कॉर्पोरेशननेही त्याची दखल घेत आता त्यानूसार बदल करण्यास सुरुवात केली आहे. या बदलांचा भाग म्हणून कल्याण पश्चिमेच्या भवानी चौकात लावण्यात बसवण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेमध्ये इंग्रजीसोबतच मराठी भाषेचाही वापर करण्यात आला आहे. इंग्रजीतील स्टॉप (STOP) आणि गो (GO) शब्दांऐवजी मराठीतून ‘थांबा’ आणि ‘जा’ असे शब्द दाखवत आहेत. येत्या काही दिवसांत शहरातील बहुतांश सिग्नल यंत्रणेवर इंग्रजीसोबतच मराठी भाषेतही सूचना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.
*मराठी भाषेतील सूचना प्रायोगिक तत्वावर सुरू – तरुण जुनेजा, स्मार्टसिटी कॉर्पोरेशन*
शहरातील सिग्नल यंत्रणांवर इंग्रजीच्या जोडीला आता मराठीतूनही सूचना दिल्या जाणार आहेत. यासाठी कल्याणात एका ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर इंग्रजीसोबत मराठी भाषेचा वापर करण्यात आला असून लवकरच इतर सर्व सिग्नल यंत्रणांमध्येही मराठीचा वापर केला जाणार आहे.